विविध वस्तूंचे ज्ञानभांडार बघण्यास पहिल्या दिवशी गर्दी
नाशिक- विविध वस्तूंचे ज्ञानभांडारच असलेले सार्वजनिक वाचनालय,नाशिक(सावाना)चे वस्तुसंग्रहालय म्हणजे अनमोल खजिनाच असून ते आमजनतेला बघण्यासाठी कायमस्वरूपी खुले करावे,असे प्रतिपादन वास्तुकलेचे ज्येष्ठ संग्राहक लक्ष्मीकांत वर्मा यांनी केले. नुकत्याच संप्पन्न झालेल्या जागतिक वस्तुसंग्रहालय दिनाच्या निमित्ताने सावानाचे वास्तुसंग्रहालय बुधवारपासून चार दिवसांसाठी सर्व नाशिककर नागरिक तसेच सभासद यांचे करता विनाशुल्क खुले करण्यात आले असून त्याबाबत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वर्मा बोलत होते.व्यासपीठावर इतिहासतज्ञ व ज्येष्ठ पत्रकार रमेश पडवळ,सावानाच्या वास्तुसंग्रहालय समितीच्या नवनिर्वाचित सचिव सौ.प्रेरणा बेळे,ग्रंथसचिव जयप्रकाश जातेगांवकर,सहसचिव अभिजित बगदे,अर्थसचिव देवदत्त जोशी,संजय करंजकर, गणेश बर्वे, मंगेश मालपाठक, सोमनाथ मुठाळ,निवृत्त न्यायमूर्ती वसंतराव पाटील,महेश शिरसाठ आदी होते. पहिल्याच दिवशी हे संग्रहालय बघण्यास नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.
हेही वाचा : सावाना मुक्तद्वार विभाग शनिवारपासून पूर्ववत
या विभागात जुने ऐतिहासिक शस्त्रगार, काचचित्रे, गंजिफा, धातूच्या मूर्ती, नाणी, चित्रे, यांचा अनोखा ठेवा आपणास येथें बघावयास मिळतो. शिल्पकला, चित्रकला तसेच प्राचीन तत्कालीन इतिहासाचे नमुने असल्याने नाशिकककरांसाठी ती अभिमानास्पद बाब असल्याचेही वर्मा यांनी नमूद केले.
.सावाना म्हणजे माणसे घडविणारी फॅक्टरी आहे.सावनामुळेच जिल्ह्यातील पुरातन मंदिरे,गडकिल्लेबाबतची माहिती कळली आणि भटकंती करून अनेक मंदिरांचा व ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास केला.अनेक पुस्तके लिहिली. नाशकात अतिभव्य असे वस्तुसंग्रहालय उभे राहू शकते.त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची अनेक लोकांची तयारी आहे.सावानाने यासाठी पुढाकार घेतल्यास हे स्वप्न साकार होऊ शकेल,असे रमेश पडवळ आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले. वस्तुसंग्रहालय सचिव प्रेरणा बेळे यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनामागचा हेतू स्पष्ट केला.प्रदर्श 28 मेपर्यंत सकाळी 11ते रात्री 8 पर्यंत विनामूल्य बघता येईल.लवकरच ते कायमस्वरूपी सर्वांसाठी खुले करण्याचा आमचा मानस आहे,असेही त्या पुढे म्हणाल्या.
या उपक्रमाचा आज पहिलाच दिवस असल्याने एक छोटेखानी स्वागत समारंभ आयोजित केला होता व त्याकरता पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात वाचनालयाचे सभासद व नाशिककर नागरिकांनी गर्दी केली होती व अतिशय उत्स्फूर्त अशी दाद देत त्यांनी हे वस्तुसंग्रहालय म्हणजे एक खूप मोठा ऐतिहासिक साठा आहे असे मनोगत व्यक्त केले.
येणाऱ्या काळात हे वस्तुसंग्रहालय शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी तसेच नाशिकला येणाऱ्या सर्व पर्यटक सुद्धा या ठिकाणी कसे येतील यासाठी नियोजन करणार असल्याचे वस्तुसंग्रहालय सचिव सौ प्रेरणा बेळे यांनी नमूद केले.
पाहुण्यांचा परिचय सहसचिव अभिजित बगदे व गणेश बर्वे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन अर्थ सचिव श्री देवदत्त जोशी यांनी मानले
हेही वाचा :सावानाचे वास्तुसंग्रहालय बुधवारपासून चारदिवस आमजनतेसाठी खुले-प्रेरणा बेळे