सावित्री…. एक युगस्री

सावित्री…. एक युगस्री

लेखक: मोहन माळी

आज वर्तमानपत्र हातात घेतल्यानंतर वाचकाचे मन हेलवल्यावाचून राहत नाही. जेव्हा तो बातमी वाचतो अल्पवयीन मुलीवर होणारे अत्याचार बलात्कार आणि हुंडाबळी नि आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या सामाजिक प्रवृत्ती या विषयाच्या अनेक बातम्या आपणास वाचावयास मिळतात तरीही आपण स्त्रीचे कर्तुत्व हे पुरुषा इतकच किंबहुना त्याहीपेक्षा जास्तच झळकताना पाहतोच.

आज स्री ची शैक्षणिक ,सामाजिक, बौद्धिक प्रगती पाहून खरी आठवण होते ती त्या माऊलीची. पण पुन्हा स्री वर होणारे अन्याय अत्याचार मग ती स्री शहरी असो वा ग्रामीण. अनेक अग्निदिव्यातून पार पडतच तिला आपल्या कर्तुत्वाला जळाळी देता येते. त्यावेळेस आठवण होते त्या युगस्रीची की याचसाठी स्री मुक्तीच्या त्या आद्य प्रणितीने तत्कालीन समाज व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारून साऱ्या प्रचलित जुनाट रूढी परंपरा मोडीत काढल्या होत्या का? ज्या काळात त्या युगधुरंदर स्रीने हे काम केले ती सामाजिक परिस्थिती त्या माऊलीची हेटाळणी, झालेला अतोनात छळ ते सारे आठवले तरी अंगावर रोमांच उभे राहतात

मनमुक्त केली तूच तलवार
नवी धार दिली तेजोमय

खरे पाहता सावित्रीबाई म्हणजे एक धगधगणारे इंजिन, अफाट नैतिक शक्तीचं साऱ्या स्री जातीच्या मुक्तीचे आणि भक्तीचे… वंदनीय सावित्रीबाईंनी सर्वप्रथम उच्चवर्णीय जातीच्या वर्तनाविरुद्ध बंड पुकारले आणि म्हणूनच आज त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्याचा घेतलेला हा धावता आलेख

मला तर वाटतं की ज्याप्रमाणे त्या निर्मिक ईश्वराची आपण आराधना करतो त्याप्रमाणे जिला ज्ञानरूपी सरस्वती मानून नव्हे आहेस ती अशा ज्ञानमाता मातोश्री सावित्रीचे प्रत्येक स्त्रीने नित्य पूजन केलेच पाहिजे. कारण सरस्वतीच्या आराधनेस आपणास ज्ञान प्राप्ती होतेच पण ती मूर्त स्वरूपात आपणास दिसत नाही श्रद्धेच्या अंतकरणानेच आपण ती अनुभवतो मात्र ज्ञानमाता सावित्री आपल्या घरात पोहोचून आपला हात धरून आपल्या आई बहिणींना शाळेत येऊन गेली. त्याकाळी मुलींनी शिक्षण घेणे समाजात रूढ नव्हते तसेच प्रस्थापित सनातन यांना ते मान्य नव्हते तेव्हा त्या मातेची मुलींना शिक्षण देण्यासाठी झालेली धडपड व या विधायक कार्यासाठी समाजाने केलेली अवहेलना आपणास ज्ञातच आहे मग करा विचार बरं त्या सरस्वती बरोबर किंबहुना त्याही आधी सावित्रीचे पूजन करणं हे समस्त स्रीवर्गाचं आद्य कर्तव्य आहे की नाही

राष्ट्राचा विकास व्हावयाचा असेल तर त्या राष्ट्रातले सारेच लोक शिक्षित झाले पाहिजे. कारण सर्व सामाजिक संकटाचे मूळ अशिक्षितपणा यामध्येच दडलेले आपणास बघावयास मिळते. भारतात १८ व्या १९ व्या शतकातली स्थिती जर लक्षात घेतली तर ती भयानक होती. त्या काळात फक्त उच्चभ्रू घरातली मुले शिक्षण घेत असत आणि मग शूद्रादिशुद्रांची मुले आणि सर्व समाजातल्या मुली शिक्षणापासून वंचित होत्या. शिक्षणाचा परिसस्पर्श त्यांना झालाच नव्हता उच्चवर्णीयांना शिक्षण ही आपलीच मक्तेदारी आहे असे वाटत होते यांच्या विरोधात क्रांतीच निशान फडकवलं ते क्रांतीज्योती सावित्रीने आणि यातच भारतीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व नैतिक विकासाचे बीज दडले होते

जोतिबांनी समाजोद्धाराचा ध्यास घेतला होता .या ज्योतीला निरंजनातल्या मुग्ध्य वातीचीही साथ मिळाली होती‌ बुरुसटलेल्या रूढी परंपरांना जाळणारे एक धगधगते क्रांतीसुर्य होती जोतिबा. जोतिबांचे कार्य असामान्य होते पण ते अति असामान्य झाले ते सावित्रीबाई मुळे जोतिबांच्या कार्याला खरी धार प्राप्त झाली. सावित्रीबाईसारख्या सह धर्मचारणीमुळेच प्रस्थापित रूढी परंपरात प्रचंड उलथापालथ करण्याचे क्रांतिकारी काम जोतिबा तितक्याच मोठ्या हिरीरीने करू शकले आणि म्हणूनच मला तरी वाटते की सावित्री सारख्या आद्य शिक्षण क्रांती प्रणेतीचा स्वतंत्र आणि व्यक्तिगत पातळीवर विचार व्हावयास हवा.

सावित्रीबाईंचे कार्य एकमेवद्वितीय आहे. याचे कारण असे की सावित्रीबाईच्या आधीही काही स्त्रियांनी समाज सुधारणेचा प्रयत्न केला होता पण सावित्रीबाईंनी थेट मुळातच हात घातला आणि तेच आजवर झाले नव्हते सावित्रीबाई जर विवाह पर्यंत निरीक्षण होत्या विवाहा नंतर त्या साक्षर झाल्या ते केवळ स्वतःच्या विकासासाठी नाही तर समजोद्धाराच्या प्रेरणेने आणि मग जोतिबांनी समस्त स्रीवर्गाला शिक्षित करण्याची जबाबदारी सावित्रीबाईच्या खांद्यावर दिली व सावित्रीबाईंनी ती तितक्याच समर्थपणे पेलली येथेच त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची खरी छबी दिसते आणि स्री समाजाला शिक्षित करताना सावित्रीबाईंनी फक्त साक्षर स्रिया घडवल्या नाही तर त्या स्त्रियांचे आत्मभान जागृत केले फक्त यांत्रिक रित्या लेखन वाचन शिकवले नाही तर त्याबरोबर मूल्ये, नीती, तत्त्व यांची बीजे त्या स्त्रियात पेरली पर्यायाने समाजात पेरले

सावित्रीबाईंचे कर्तुत्व एवढेच होते का की त्या महात्मा फुले यांच्या समाजोद्धाराच्या कार्यात एक शिक्षिका म्हणून होत्या नाही त्याही पलीकडे त्यांचे कार्य एका उंच उंच शिखराप्रमाणे आहे ज्याकडे पाहताना आपली नजरही पोहोचत नाही पुढील काही बाबी लक्षात घेता त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आराखडा आपल्या लक्षात येईल.स्री शिक्षणाचा पाया घालण्याचे अलौकिक कार्य या माऊलीने केले. निराधार काशीला जीव देण्यापासून परावर्त करून तिच्याच मुलाला स्वतः दत्तक घेतले नी तिच्यासारख्या दैवगतीच्या भोवऱ्यात सापडलेल्या स्त्रियांसाठी अनाथ अर्भकालय सुरू केले. केशवपन सारखी दुष्ट रुढी बंद पडावी म्हणून न्हाविकांचा संप करून आणला. सावित्रीबाईंनी लेखन केले, काव्य केले काव्यसंग्रह लिहिला ते काही स्वतःची प्रतिमा सिद्ध करण्यासाठी नाही तर समाजाचा उद्धार करण्याच्या प्रेरणेतून विधवा ,विवाह महिला संघ, बालहत्या प्रतिबंध गृह यशस्वीपणे चालविले. दुष्काळा सारख्या प्लेगसारख्या नैसर्गिक संकट समयी अन्नदानाचे मोठं काम केले. बालसंगोपन केंद्र चालविले त्यातल्या प्रत्येक निराधार मुलाला मायेच्या प्रेमाने वाढवलं या साऱ्यातही यशवंताला सावित्रीबाईंनी दत्तक घेणे ही तत्कालीन समाज रचनेत पांढरपेशा वर्गाच्या विरोधात लढाई होती हे सावित्रीबाईंनी मोठं क्रांतिकारी पाऊल होतं.

विश्व मानवतेचा विचारच माणसाला तारणारा असतो. माणसाच्या वास्तव्याला शिक्षणातून जागृती मिळते त्यासाठी शिक्षणाचा विचार ऊक्ती व कृतीतून मांडला

विद्या हे धन आहे रे
श्रेष्ठ साऱ्या धनाहुनी
तिचा साठा जयापाशी
त्यासी श्रेष्ठ मानती जन

शिक्षणाचं असं महत्त्व सामान्यांना पटवून दिले म्हणूनच सावित्रीच जगणं अंधारलेल्यांसाठी प्रकाशाकडे नेणारी पाऊलवाट ठरली
आणखी लक्षात घेण्याजोगी दुसरी गोष्ट म्हणजे महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे कार्य जितक्या समर्थपणे सावित्रीबाईंनी पेलले त्याचे कौतुक करावे तेवढेच थोडे १८९० साली जोतिबांचे निधनाच्यि वेळी सारे फुलेंचे नातेवाईक आडवे आले की यशवंताला प्रेत यात्रे पुढे टिटवे धरू दिले जाणार नाही त्यावेळी धिरोदात्त स्वभावाचा खरा पैलू दिसला आणि तो म्हणजे त्या धैर्यशाली मातेने स्वतः टिटवे धरले आणि प्रेतयात्रा पुढे चालू दिली. मला वाटतं इतिहासात अशी दुसरी घटना सापडणार नाही तत्कालीन समाजातील स्त्रीचे स्थान पाहता सावित्रीबाईंच्या कार्याची व्याप्ती आणि मोठेपणा लक्षात येतो

लोकहितवादी एका ठिकाणी म्हणतात की ,हिंदूंनो धन्य तुमची! तुम्हीच आपल्या मुलीचे खाटीक स्वस्थपणे होता. खरच त्यावेळीचे स्त्रीचे स्थान तिचा होणारा बालविवाह स्री पुरुष वयातला फरक त्यामुळे येणारे अकाली वैधव्य आणि त्यापुढील सर्वात मोठे महासंकट म्हणजे विधवेच जिणं तिच्या होणाऱ्या हाल अपेष्टा. सन 1891 च्या खाणे सुमारीनुसार महाराष्ट्रात केवळ शून्य ते चार वर्षे वयाच्या विधवा झालेल्या आईचे स्तनपानही न सुटलेल्या लहान बालिका म्हणजेच बाल विधवांची संख्या १३८७८अशी होती. बाल वयात आलेलं वैधव्य त्यातच पुन्हा सारं आयुष्य जळत कुढत काढावे लागे. विधवांनी आपल्या साऱ्या भाव-भावना मारून जगावे अशी साऱ्यांची जोर जबरदस्ती असे. मग त्या विधवेने जाडे भरणे लांबडे वस्र घावायचे .पायात जोडे तर नाहीच शिवाय स्वयंपाक घरात तिने सतत राहावयाचे कोणत्याही समारंभाला तिने उपस्थित राहायचे नाही कोणताही दागिना तिने घालायचं नाही या सर्व हाल अपेष्टात सर्वात वरची कडी म्हणजे विधवेच केशवपन.

या सर्व दुष्ट रूढी. नियम होते ते नवऱ्यासोबत सती न गेलेल्या विधवांसाठी समाजाचा तर असा प्रयत्न असायचा की स्रीने पतीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या सरणात स्वतःला सती जावे या साऱ्या दुष्टरुढींना कृतींतुन विरोध करणारी महिला म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

पांढरपेशा वर्गाने शिक्षण ही सामाजिक बाब नसून धार्मिक बाब आहे असे अवडंबर माजवल्याने जणू मुलींचा शिक्षणाचा हक्क तर हिरावून घेतला होता कारण मुली शिकल्या तर त्या कुमार्गाला लागतात धर्म भ्रष्ट होतो अशा एक नाही तर कितीतरी असंख्य धर्मसंकट धर्म मार्तंडांना भेडसावत होते. पण सावित्रीबाई फुले व जोतिबांनी हे ओळखले होते की समाजातल्या या साऱ्या वेडगळ व बुद्धी कुंठीत करणाऱ्या कल्पना व रुढी जर काढून टाकायच्या असतील तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षणाचा खरा प्रसार झाला पाहिजे तो तळागाळापर्यंत आणि विशेषता मुलींना शिक्षण मिळालेच पाहिजे आणि आजवर जे घडले नाही ती क्रांतिकारी घटना त्यांनी घडून आणली. १जानेवारी १८४८ ला पुणे येथे बुधवार पेठेत भिडे वाड्यात या समाजशिक्षिकेने आपल्या पवित्र कार्याची मुहर्तमेढ रोवली

प्रत्येक अडचण ही प्रगतीसाठी सुवर्णसंधी असते या नियमानुसार सावित्रीबाईंनी आपले काम तेवढ्याच उत्स्फूर्तपणे सुरू ठेवले. भारतीय समाजातील समस्त स्रीवर्ग तर त्या माऊलीचा आजन्म धन्य राहील. आज महिलांसाठी स्वतंत्र आयोग ,स्वतंत्र मंडळे, महिलांचा सत्तेत असणारा सक्रिय सहभाग, क्रीडा, संस्कृती ,कला शिक्षण ,विज्ञान, अभियांत्रिकी प्रशासकीय ही सारीच क्षेत्रे पादाक्रांत करुन स्रीने आपले स्वयंभू कर्तृत्व व स्थान आपल्या सामर्थ्यातून सिद्ध केले आहे ते केवळ शिक्षण या माध्यमातुनच .हे अलौकिक कार्य घडविले त्या मातेने सावित्रीने कितीही वर्णिले त्या माऊलीचे महात्म्य तरी शब्द तोडकेच आहेत

काय वर्णू आता
न पुरे ही वाणी
मस्तक चरणी ठेवीतसे

समाजाचे स्री चे खरे शोषण सावित्रीबाई फुले यांनी थांबविले. म्हणूनच फक्त त्या सावित्री मातेच्या स्मरणाने नतमस्तक होते आज प्रत्येक भारतीय स्त्रीचे मन. समाजोन्नत समाजाचे प्रकाशाचे बेट म्हणजे सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य आहे म्हणूनच युगानुगे स्रीही सावित्रीला वंदन करत राहील पूजन करत राहील.

मोहन माळी
सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिर द्वारका नाशिक
9420089836

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *