सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राला
कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे नाव…
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राला कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे नाव देण्यात येणार आहे.
राज्याचे दिवंगत महसूलमंत्री व विद्यापीठाच्या पहिल्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एकुणच जडणघडणीत मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे नाशिक उपकेंद्राला कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आधीसभा सदस्यांनी रविवारी अधिसभेत मांडला, यावेळी हा प्रस्ताव सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला. मौजे शिवनई येथे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राची इमारत बांधून तयार असून, लवकरच या इमारतीचे लोकार्पण होणार आहे.
त्याच लोकार्पण सोहळ्याच्या वेळी कर्मवीर भाऊसाहेब हिरे व अहिल्यानगर येथील उपकेंद्राला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे. अधिसभा सदस्य डॉ. अपूर्व हिरे, अशोक सावंत, डॉ. संपत काळे, डॉ. चिंतामणी निगळे यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाच्या प्रचार व प्रसारासाठी आयुष्य वेचणाऱ्या तसेच
” बहुजन हिताय बहुजन सुखाय” हे ब्रीद वाक्य घेऊन शैक्षणिक व सामाजिक क्रांती घडवणाऱ्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या थोर कार्याचा गौरव यानिमित्ताने होणार आहे.
—
कर्मवीर भाऊसाहेब हिरेंचे योगदान
नाशिक उपकेंद्राच्या इमारतीचे लोकार्पण तातडीने करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. त्यामुळे येत्या एक- दीड महिन्यात या इमारतीचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर डॉ. मुकुंद जयकर यांच्या काळात भाऊसाहेब हिरे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होते. शिक्षणाबद्दल त्यांची तळमळ मंत्री झाल्यानंतरही कायम होती. पुढे १९५२मध्ये कर्मवीर हिरे हे राज्याचे महसूल मंत्री झाले. त्याकाळी विद्यापीठाला जागा कमी पडत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी एक रुपया वार्षिक भाडे करारावर विद्यापीठाला जवळपास चारशे एकर जागा व त्या काळातील व्हाईसरॉयचा बंगला प्रशासकीय इमारतीसाठी मिळवून दिला. . आजही विद्यापीठ प्रशासनाचे कामकाज याच इमारतीमध्ये चालते.