सावरकरांनंतर शिवाजी महाराज
इतिहासाचे संदर्भ देताना अनावश्यक वाद निर्माण होणार नाहीत, याची दखल आपल्या देशातील राजकीय नेत्यांनी घेणे आवश्यक आहे. नाहक भावना दुखविणारी विधाने करणे टाळले पाहिजे. परंतु, आपण इतिहासाचे जाणकार आहोत, हे दाखविताना राजकीय मंडळी चुका करतात. त्यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटतात. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याचे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर राज्यातील तापलेले राजकीय वातावरण थंड होण्याआधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वेगवेगळी वादग्रस्त विधाने केल्याने वातावरण आणखी तापले आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी विधान केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजपा आणि शिवसेना-शिंदे गट या पक्षांनी आक्रमक पवित्रा घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार्या शिवसेनेवरही शरसंधान केले होते. कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्या वक्तव्यांनी परिस्थिती उलटी झाली आहे. शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्ये केल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेऊन कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्यावर टीका करताना राज्यपालांची बाजू घेणार्या भाजपाला आणि शिवसेना-शिंदे गटालाही जाब विचारला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांची ओळख सामान्य जनतेला आतापर्यंत चांगलीच झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर कौतुक करणारे कोश्यारी भाजपाचेच आहेत, हे आता कोणाला सांगण्याची गरज राहिलेली नाही. मराठीच्या अजेंड्याला हिंदुत्वाची जोड देत भाजपाच्या सुरात सूर मिसळविणाऱ्या मनसेने मात्र अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन राज्यपाल नावाचे पार्सल परत पाठविण्याची मागणी केली आहे. अशाच प्रकारची मागणी शिवसेना-ठाकरे गट, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आणि छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिंदे सरकार यांच्यावर तुटून पडण्याची आयती संधी मिळाली आहे. इतिहासाचे संदर्भ हाच आपल्या राजकारणाचा विषय झाला आहे काय? हाच प्रश्न आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटात बाजी प्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी चुकीचे संदर्भ सांगितले जात असल्याचा आरोप झाल्यानंतर सावरकरांची देशभक्ती पुन्हा चर्चेत आली. आता पुन्हा शिवाजी महाराज यांना पुन्हा चर्चेत आणण्यात आले आहे. सर्व काही ठरवून, तर नाही ना? अशी शंका सामान्य जनतेच्या मनात उपस्थित होत आहे.
असहमतीही नाही
कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्या वक्तव्यांनी भाजपाचे महाराष्ट्रातील नेते बॅकफूटवर गेले आहे. शिवसेना-ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत आणि युवानेते आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या सावरकरांविषयीच्या विधानावर असहमती दर्शविली होती. इतकेच नव्हे, राहुल गांधी यांनी पदयात्रेत सावरकरांचा विषय काढण्याची गरज नव्हती, असे राऊत यांनी सुनावून महाविकास आघाडीत फूट पडण्याचा इशाराही काँग्रेसला दिला होता. याउलट भाजपा नेत्यांनी कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नाही, असे विधानही केलेले नाही. राज्यपाल आणि त्रिवेदी आपलेच असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना टीका करता येत नाही. “छत्रपती शिवाजी महाराज आदर्श होते आणि अनेक पिढ्यांना राहतील. देशात आणि राज्यात शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर देशाने आणि राज्याने करायला हवा,” असे स्पष्टीकरण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यामध्ये शिवाजी महाराजांची महती त्यांनी अधोरेखित केली असली, तरी कोश्यारी आणि त्रिवेदी यांचे थेट नाव त्यांनी घेतले नाही. भाजपाचे दुसरे एक नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सावध पवित्रा घेतला. कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल ‘कालबाह्य’ शब्द वापरला नाही, असे म्हणत मुनगंटीवार यांनी सारवासारव केली. बाळासाहेब ठाकरे यांना प्रतिशिवाजी म्हटले जायचे आणि शरद पवार यांना जाणता राजा म्हटले जाते, याचे उत्तर शोधावे लागेल, असे मुनगंटीवार यांनी म्हटले. परंतु, त्यांनी राज्यपालांच्या विधानाशी असहमती दर्शविली नाही आणि त्रिवेदी यांचा उल्लेखही केला नाही. शिंदे गटाच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही असहमती दर्शविली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन चर्चा करतील, असे सामंत यांनी म्हटले आहे. एखादी व्यक्ती वैयक्तिक पातळीवर जे बोलली तेच सरकारचे मत आहे, असे मानने चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनीही निषेध केला नाही. शिवाजी महाराजांचा अवमान होत असताना भाजपा आणि शिंदे सरकार साधा निषेधही करत नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आक्रमक होत आहे.
टीकेला धार
आज तक या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सुधांशु त्रिवेदी यांनी सावरकरांची बाजू मांडताना शिवाजी महाराजांनीही औरंगजेबाची माफी मागितली होती, असा दावा केला. “सावकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती, असे सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोक प्रस्तावित फॉरमॅटमधून बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलंये होते. मग याचा अर्थ काय झाला? असा सवाल त्रिवेदी यांनी केला. शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श आहेत, असे म्हणत नव्या काळातील आदर्श म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी असल्याचा उल्लेख राज्यपाल कोश्यारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात केला. कोश्यारी आणि त्रिवेदी यांची विधाने न पटणारी असल्याने संजय राऊत यांनी एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. छत्रपतींनी जर माफी मागितली तर मग पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन शिवरायांचा जयजयकार का करतात? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली, ते स्वाभिमानांचं तुणतुणं वाजवत. स्वाभिमान, स्वाभिमान म्हणत भाजपाबरोबर गेले ना, मग आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? आता भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला जोडे मारणार की राज्यपालांना? वीर सावरकरांच्या अपमानानंतर तुमची लोक मुंबई आणि महाराष्ट्रात रस्त्यांवर उतरून राहुल गांधींना जोडे मारत आहेत, आता ते जोडे कुठे गेले? कोणाला जोडे मारणार तुम्ही? शिवाजी महाराजांनी पाचवेळा औरंगजेबाची माफी मागितली. ही भाजपाची अधिकृत भूमिका आहे का? असे सवाल राऊत यांनी उपस्थित करुन भाजपा आणि एकनाथ शिंदे सरकारची कोंडी केली आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ अशा अनेक नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका करण्याची संधी साधली. महाराष्ट्रात आल्यापासून ते वादग्रस्त विधाने करत असल्याने ते टीकेचे धनी अधूनमधून होतच आहेत.