लिंकिंगला नाही म्हणा, कृषी निविष्ठा दुकानांमध्ये लागले फलक

कृषिमंत्र्यांच्या निर्णयाने शेतकर्‍यांना दिलासा, आर्थिक भुर्दंड टळणार

सिन्नर : प्रतिनिधी
युरिया आणि डीएपी सारख्या खतांबरोबर अन्य लिंकिंग केलेल्या खतांची सक्ती दुकानदारांकडून शेतकर्‍यांना केली जात असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी
मात्र या लिंकिंग संदर्भात कडक पावले उचलल्याने खतविक्रेत्यांनी आता दुकानांमध्येच लिंकिंगला नाही म्हणा अशा प्रकारचे फलक दर्शनीय भागात लावल्याने शेतकर्‍यांची आर्थिक लूट थांबण्यास मदत होणार आहे. पहिल्यांदाच कृषी विभागाने असा प्रयोग राबवल्याने शेतकर्‍यांची लूट थांबण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्रात युरिया, डीएपी सारख्या खतांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यातूलनेत तुलनेत राज्य शासनाकडून पुरवठा केला जात नाही. परिणामी लिक्विड युरिया आणि अन्य खते घेतल्यास युरिया किंवा डीएपी सारखे खते मिळतील अशी अट अनेक कंपन्यांकडून कृषी निविष्ठा विकणार्‍या दुकानदारांना घातली जात होती. परिणामी, दुकानदारांनाही नाईलाजाने खतांचा स्टॉक मेन्टेन करण्यासाठी खतविक्रेत्या कंपन्यांकडून लिंकिंग असलेली खते विकत घ्यावी लागत होती. खते घेण्यासाठी दुकानात येणार्‍या शेतकरी ग्राहकांना ही लिंकिंग खते दुकानदारांकडून विकत घेण्याची सक्ती केली जात असे. गरज नसतानाही निविष्ठा विक्रेत्या कंपन्या ही खते खतविक्रेत्या दुकानांच्या माथी आणि दुकानदार ती खते शेतकरी ग्राहकांच्या माथी मारत. त्यामुळे गरज नसतानाही किंबहुना या लिंकिंग खतांचा चांगला, वाईट परिणाम माहीत नसतानाही शेतकर्‍यांना त्यांचा वापर करावा लागत असे.
मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी लिंकिंगला ब्रेक लावला. कृषी खात्याला लिंकिंगला नाही म्हणण्यासंदर्भात आदेश दिले. तसे फलकच दर्शनीय भागात लावण्याची सक्ती कृषी विभागाने केली. विशेष म्हणजे दुकानांच्या दर्शनी भागात लावलेल्या फलकांवर सक्ती केल्यास जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय किंवा तालुका पंचायत समिती कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यावर भ्रमणध्वनी क्रमांकही दिले आहेत. दुकानदारांनी हे फलक दर्शनीय भागात लावल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

दुकानदारांकडून निर्णयाची अंमलबजावणी

लिंकिंगला नाही म्हणा, या आशयाचे बॅनर्स तालुक्यात कृषी निविष्ठा विकणार्‍या 200 कृषी दुकानदारांनी लावले आहेत. या बॅनरमुळे शेतकर्‍यांमध्ये लिंकिंगबाबत जागृती झाली आहे. लिंकिंगबाबत सक्ती होत असल्याबाबतची तक्रार कृषी विभागाकडे आल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. लिंकिंगला नाही म्हणा, हा शेतकरी व दुकानदार यांच्यासाठी सकारात्मक निर्णय ठरणार आहे.
-ज्ञानेश्वर नाठे, तालुका कृषी अधिकारी, सिन्नर

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *