संयमी सत्य जित!
गोरख काळे
नाशिक पदवीधर निवडणुकीत एकटे सत्यजित तांबे महाविकास आघाडीवर भारी पडले. गुरुवारी (दि. 2) तांबे यांनी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांचा तब्बल 29 हजारांनी दारुण पराभव केला. या विजयातून नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे घराण्यास किंग का म्हणतात हे या निकालाने सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत तांबे यांच्याविरोधात रान उठविण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, डॉ. सुधीर तांबे यांचा 14 वर्षांपासूनचा नाशिक विभागातील दांडगा संपर्क, शिक्षकांसाठी झगडणारा आमदार अशी तयार झालेली छबी याचीच मदत सत्यजित तांबे यांना झाली. आता युवा चेहर्याला संधी देत असल्याचे सांगत डॉ. सुधीर तांबेंनी माघार घेतली. याचाच परिपाक म्हणून आणि तांबे यांच्या सशक्त असलेल्या यंत्रणेमुळे सत्यजित तांबेंनी एकतर्फी विजय मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला.
सत्यजित तांबे यांच्यासमोर महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांच्या रूपाने आव्हान देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला पाटील या तांबे यांना कडवी झुंज देतील आणि पदवीधर निवडणूक अटीतटीची होईल अशी राजकीय हवा होती. मात्र, ही केवळ चर्चा ठरली. पाटील या त्यांच्या वक्तव्यांनी आणि कृतीने
चर्चेत येत होत्या. मात्र, याच्या उलट तांबे ग्राउंड लेव्हलवर जाऊन काम करत असताना दिसले. एकप्रकारे पाटील यांचा उथळ प्रचार होताना दिसला आणि येथेच शुभांगी पाटील कमी पडल्या. दरम्यान, पदवीधर निवडणूक म्हटली तर एका तालुक्यात किती मतदार आणि त्या तालुक्याची जबाबदारी कोणावर द्यायची, अशी यंत्रणा असावी लागते. याच पद्धतीने सत्यजित तांबे यांची यंत्रणा गेल्या कित्येक दिवसांपासून काम करत होती. सत्यजित तांबे, डॉ. सुधीर तांबे यांचे पुत्र असल्याने प्रारंभी त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप झाला.. परंतु राजकारणात जी एक परिपक्वता असावी लागते. ती सत्यजित तांबे यांनी पदवीधर निवडणुकीत दाखवून दिली. राजकीय प्रश्नांना सतत बाजूला सारत, कोणत्याही टीकेला उत्तर न देता निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करत काम करत राहिले. त्यांच्या या परिपक्वतेची नाशिक विभागात बरीच चर्चा झाली. याउलट शुभांगी पाटील या तांबे यांच्यावर आरोप करत निवडणुकीत कॉन्ट्रोव्हसी तयार करण्याचा प्रयत्न केला. उदा. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील घरी जाणे, यासंह बंगल्याविरुद्ध झोपडीतली लढाई अशा काही गोष्टींमुळे त्यांनी चर्चेत येण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या पदवीधरांचे मतांतर करू शकल्या नाहीत. सत्यजित तांबे यांनी 54 तालुक्यांतील मतदारांपर्यंत कसे जाता येईल, यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले. विभागातील जी छोटे गावे, शहरे होती जेथे जाणे शक्य नव्हते. तेथे बॅनर लावून मतदारांपर्यंत सपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर एकट्या सत्यजित तांबेंविरोधात शुभांगी पाटील यांच्या पाठीमागे शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी ताकद लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांबे तिन्ही पक्षांना पुरून उरले अन् चौथ्यांदा तांबे घराण्यात आमदारकी खेचून आणली.
कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा तांबेंनाच हात
शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्यानंतर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या घटक पक्षांकडून मदत केली जाईल, असे बोलले गेले, मात्र पदवीधर निवडणुकीत सेना वगळता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून चांगली मदत झाली नसल्याची चर्चा आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाशिकमध्ये येत शुभांगी पाटील यांच्यासाठी काम करण्याचे आदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले. मात्र, ते माघारी फिरताच पुन्हा अनेक पदाधिकारी सत्यजित तांबे यांच्यासाठी काम करत असल्याचे दिसले. ज्या शैक्षणिक संस्थांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत होणे अपेक्षित असताना तसे झालेले दिसत नाही. या संस्था दोन्ही कॉंग्रेसच्या जवळच्या लोकांच्या होत्या. त्यामुळे पदवीधर निवडणुकीत सेना वगळता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी तांबे यांच्यासाठी मदत केल्याची भावना सेनेतील काही जण बोलून दाखवीत आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघ अन्
तांबे समीकरण अतूट
नाशिक पदवीधर निवडणूक म्हटली की, तांबे यांचेच नाव यायचे, मात्र ही निवडणूक तांबे यांच्यासाठी सहज नव्हती असे बोलले जायचे. कारण अपक्ष उमेदवारी करून तीन मोठ्या पक्षांना आव्हान देऊन विजय मिळवणे सोपे नव्हते. मात्र, हे आव्हानही तांबे यांनी लीलया पार पाडले. दरम्यान, आता नाशिक पदवीधर अन् तांबे हे आता समीकरणच झाले आहे.
भाजपची अदृश्य शक्ती पाठीशी
पदवीधर निवडणुकीची व्याप्ती पाहता अपक्ष उमेदवारी करणे सोपे नव्हते. म्हणून की काय भाजपने ठरवल्याप्रमाणे तांबे यांच्यासाठी पडद्यामागून हालचाली केल्या. भाजपकडे जी काही त्यांच्या हक्काची मते होती ती त्यांनी तांबे यांच्यासाठी दिल्याचे बोलले जात आहे. विशेषतः सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर अनेक भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सऍपवर तांबेंच्या विजयाचे फोटो झळकत होते.