उदयन केअर संस्थेतर्फे 50 मुलींना स्कॉलरशिप

नाशिक : प्रतिनिधी
दिल्ली येथील प्रसिद्ध उदयन केअर या संस्थेच्या नाशिक शाखेच्या वतीने 50 मुलींना बी. सी. जिंदाल फाउंडेशनच्या सहयोगाने उदयन शालिनी फेलोशिपअंतर्गत पाच वर्षांकरिता आर्थिक मदतीच्या रूपाने स्कॉलरशिप देण्यात आली. या स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थ्यांचा साधारण पाच वर्षांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च जो साधारण प्रतिवर्ष बारा हजारांपर्यंत येतो, तो संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीही संस्थेतर्फे 50 विद्यार्थिनींना स्कॉलरशिप देण्यात आलेली होती. दिल्लीमध्ये सन 2002 मध्ये स्थापन झालेल्या उदयन केअर या संस्थेच्या भारतात 32 शहरांमध्ये शाखा आहेत. उदयन शालिनी फेलोशिप हा उदयन केअरचा अनोखा उपक्रम असून, त्यात दुर्बल सामाजिक, आर्थिक पार्श्‍वभूमीतील पात्र व हुशार मुलींसाठी शैक्षणिक उत्कृष्टता व व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यक्रम राबविते. या कार्यक्रमाचा उद्देश मुलींना त्यांच्या शिक्षणाच्या अधिकारासह सक्षम करणे, जेणेकरून त्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करून सन्माननीय जीवन जगता यावे, हा आहे. महात्मानगर येथील क्रिस्टल बँक्वेट येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी यूएसएफचे सहयोगी संचालक मोहम्मद फहीम खान, विश्‍वास बँकेचे अध्यक्ष विश्‍वास ठाकूर, निवेकचे अध्यक्ष संदीप गोयल, आशा गोलिया, रुचिता ठाकूर, नितीन पाटील, राजेश बोरा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अर्चना साबू, प्रिया हरिहरन, रेणू वावरे, दीपाली गुप्ता, ममता पंजवानी, शैलजा कलकुरी, विनिता बंका, कोमल आहुजा, जॉयस पाडळे आदींनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *