अंबड येथे स्कूल बस काचेवर दगड मारून नुकसान

रिक्षाचालकावर गुन्हा

सिडको : विशेष प्रतिनिधी
घरकुल योजना गेट, चुंचाळे शिवार, अंबड येथे स्कूल बसवरील हल्ल्याच्या प्रकाराची माहिती पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मिळाल्यानंतर चुंचाळे पोलीस चौकीमार्फत तत्काळ कारवाई करत रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 11 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. खबरी शाम नारायण जगताप (वय 41, रा. तळेगाव, ता. इगतपुरी) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, स्कूल बसचालक खड्डयामुळे गाडी हळूहळू पुढे नेत असताना, समोरून आलेल्या रिक्षाचालकाने बससमोर रिक्षा लावून वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिवीगाळ करत स्कूल बसला लाथ मारली व ड्रायव्हरला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. बस पुढे जात असताना बसच्या पाठीमागील काचेवर दगड मारून नुकसान केले. बसमध्ये शालेय विद्यार्थी असतानाही असे कृत्य केल्यामुळे विद्यार्थी गंभीर जखमी होण्याचा धोका निर्माण झाला होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रिक्षाचालक पंकज रतिलाल सोनवणे (वय 24, रा. घरकुल बिल्डिंग नं. 4, अंबड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक गणेश मुगले या प्रकरणाचा तपास करत आहेत. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ स्कूल बसचालक, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधत घटनास्थळी भेट दिली आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षाची ओळख पटवली. पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईबद्दल संस्थेच्या संचालकांनी पोलीस ठाण्यात येऊन आभार मानले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *