अंबड एमआयडीसीत स्क्रॅप चोरी उघड

दहा लाखांचा मुद्देमाल जप्त; युनिट-2ची कामगिरी

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड औद्योगिक वसाहतीतील ए.ए. ट्रेडर्स या स्क्रॅप विक्रेत्याच्या दुकानातून लाखो रुपयांचा माल चोरी करणार्‍या गुन्हेगारास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सुमारे 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या अंबड-लिंकरोडवरील ए.ए. ट्रेडर्स दुकानातून एमएच 09 सीए 1013 या क्रमांकाची आयशर गाडी वापरून सुमारे 8 लाख 82 हजार रुपये किमतीचा 20 टन 210 किलो वजनाचा स्क्रॅप माल चोरीस गेला होता. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-2 कडून या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण व सखोल चौकशीद्वारे आरोपी आसीफ युसूफ पठाण (वय 29, रा. सुंदरनगर, जालना) याचा ठावठिकाणा शोधण्यात आला.
गुन्हे शाखेच्या पथकाने जालना जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील कीर्ती ट्रान्स्पोर्ट पार्किंगमध्ये सापळा रचून आरोपीला अटक केली. अटक केल्यानंतर चौकशीत त्याने चोरी केलेला स्क्रॅप जालना येथे विकल्याची कबुली दिली. त्यानंतर 5 लाख रुपये रोख रक्कम व आयशर गाडी असा एकूण 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईत सपोनि डॉ. समाधान हिरे, पोउनि मुक्तारखान पठाण, सपोनि गुलाब सोनार, पोहवा अतुल पाटील, मनोज परदेशी, नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी यांचा सक्रिय सहभाग होता. तांत्रिक विश्लेषणासाठी सपोनि तारडे व त्यांच्या सहकार्‍यांनी विशेष मदत केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *