संस्कार

मानवी जीवन हे इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळे आहे. ते भव्य आणि दिव्य आहे.भव्य दिव्य याकरिता की, मनुष्य प्राण्यावर जन्मपूर्व ते जन्मोतर विविध प्रकारचे संस्कार केले जातात आणि म्हणूनच त्याला भव्यता आणि दिव्यता प्राप्त होते. याचे प्रातिनिधिक स्वरूपातील काही उत्तम उदाहरणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. राजमाता जिजाऊने त्यांच्यावर केलेल्या उत्तम संस्कारांमुळेच ते हिंदवी स्वराज्याची स्थापना ते करू शकले .पौराणिक काळाचा विचार करता भक्त प्रल्हादाची आई कयादू ही देखील गर्भावस्थेत असताना नारदांच्या आश्रमात  राहिल्याने तेथे झालेल्या संस्कारांमुळेच जन्मदाता असूर असूनही प्रल्हादासारखा भक्त तिच्या पोटी जन्माला आला .अर्जुनपुत्र अभिमन्यू याच्यावर देखील आईच्या पोटात असतानाच युद्धकौशल्याचे  संस्कार झाल्यामुळेच तो चक्रव्युह भेदू शकला.
मानवी जीवनात संस्काराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे .मनुष्याच्या सहज प्रवृत्तीचा विकास करून त्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणाकरिता संस्काराची आवश्यकता भासते. संस्काराचा मूळ अर्थ शुद्धीकरण असा होय. शरीर,मन, बुद्धी यांची शुद्धता करण्यासाठी संस्कार केले जातात.संस्कार म्हणजे सम्यक आकार. चांगली कृती. संस्कार म्हणजे सदगुणांचा गुणाकार. चांगल्या गुणांचे वर्धन करणे तर दुर्गुणांचा भागाकार दुर्गुणांची वजाबाकी होय. संस्कार म्हणजेच जीवनात चांगल्या सवयी विकसित करणे किंबहुना चांगल्या सवयी लावून घेणे.दिले जाते ते शिक्षण, परंतु केले जातात आणि उचलले जातात ते संस्कार होय.म्हणूनच  शास्त्रकार सांगतात की, मनुष्याला  दोन कारणांकरीता संस्कारांची आवश्यकता असते. एक म्हणजे पूर्वकर्माचे दोष दूर करणे आणि दुसरे म्हणजे नवेदोष लागू न देणे म्हणजेच स्वतःमध्ये चांगल्या गुणांचे  विकसन करणे. त्यानंतरच तो  खरा योग्य माणूस म्हणून समाजात वावरू शकतो
व्यक्तीचे विचार आणि कृती चांगली होण्यासाठी ,आनंदी जीवनासाठी ,चारित्र्यसंपन्न व सुसंस्कृत व्यक्ती घडविण्यासाठी, आदर्श पिढी निर्माण होण्यासाठी,सुदृढ समाज आणि बलशाली राष्ट्र निर्माणाकरिता संस्कारांची अत्यंत आवश्यकता  आहे .सुसंस्कार व्यक्तीला नैतिक,व्यक्तिगत आणि अध्यात्मिकदृष्ट्या अलंकृत करत असतात. म्हणूनच  वैदिक संस्कृतीमध्ये 16 संस्कार सांगितलेले आहे. त्यामध्ये गर्भधारणेपासून ते मृत्यूनंतर करावयाच्या संस्कारांचा समावेश होतो.
मानवी जीवन उन्नत व सुदृढ करण्यासाठी त्या त्या वयानुसार आणि परिस्थितीनुसार विधियुक्त असे 16 संस्कार करून जीवाच्या विचारात परिवर्तन केले जाते. ज्यामुळे शरीर,मन ,आत्मा यांचेवर संस्कार होतात. यामध्ये 1)गर्भाधान 2)पुत्रप्राप्ती 3)सीमांतोन्नयन4)जन्मविधी (जातकर्म)5)नामकरण 6)निष्क्रमण (बालक बाहेर नेणे)7)अन्नप्राशन(बालकास प्रथम अन्न देणे )8)चौलकर्म (शेंडी ठेवणे) 9) विद्यारंभ10)कर्णवेध11) यज्ञोपवित 12)वेदारंभ 13) केशान्त14) समावर्तन 15)विवाह 16)अंत्येष्टी इत्यादींचा समावेश होतो. यामध्ये शेवटचा संस्कार मृत्यूनंतर तो फक्त देहावर केला जातो. तोच अंत्यसंस्कार होय. हे जन्मपूर्व आणि जन्मोत्तर संस्कार जीवाच्या लौकिक आणि पारलौकिक सुख समृद्धीची कामना करतात.
’संस्कारात द्विज उच्च्यते’ असे म्हटले जाते. द्विज म्हणजे ब्राह्मण. ब्राह्मण हा जातिवाचक शब्द नसून तो वृत्तीवाचक तसेच गुणवाचक शब्द आहे. ब्राह्मण याकरिता भागवतकरांनी चार गुण सांगितले आहे त्यामध्ये जितेंद्रिय, तेजस्विता, शांतचित्त आणि ब्रह्मचारी. इथे ब्रह्मचारी याचा अर्थ अविवाहित नव्हे तर वेदांचे विचार  घेऊन समाजात फिरणारा होय. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कृष्णमित्र सुदामा होय. अशा प्रकारची वृत्ती ही संस्कार आणि संगतीमुळे निर्माण होते.
सुसंस्कारामुळे समाजात उत्तम समन्वय प्रस्थापित करून व्यक्तीचे सामाजीकरण होते .व्यक्ती समाजाचा एक उपयुक्त घटक बनतो.  शाळेमध्ये देखील दैनंदिन परिपाठाच्या माध्यमातून मुलांवर सुसंस्कार रुजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. आई-वडील ,गुरुजन हे मुलांवर विविध प्रकारचे चांगले संस्कार करत असतात. त्याचप्रमाणे मुले देखील आपले आई-वडील ,गुरुजन वडीलधारी मंडळी यांच्या वर्तणुकीतून, दैनंदिन वागणुकीतून नकळतपणे संस्कार उचलत असतात .म्हणूनच मुलांना घडवताना कुंभार जसा घट बनविताना बाहेरून एका हाताने थापटी मारतो आणि दुस-या हाताने आतून आधार देतो .त्याप्रमाणेच मुलांवर संस्कार करताना पालक शिक्षकानांही कुंभाराप्रमाणेच कधी प्रेमाचा ओलावा तर कधी धाक ,शिस्त यातून मुलांवर संस्कार करणे गरजेचे ठरते. जेणेकरून अति लाडाने किंवा अति धाकाने सुद्धा मूल वाया जाणार नाही यासाठी सदैव दक्ष रहावे लागते. त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकेल यासाठी जाणीवपूर्वक संस्कार करावे लागतात.आईबाप होणे सोपे असते परंतु पालक होणे सोपे नसते .
दैनंदिन जीवन जगत असताना साधी पोळी करायची असली तरी देखील तत्पूर्वी गव्हावर अनेक संस्कार करावे लागतात. कापसावर संस्कार केल्यानंतरच तर वस्त्र मिळते. धातूंवर संस्कार केल्यानंतरच उत्तम ,सुंदर दागिने मिळतात. मातीवर संस्कार केल्यानंतरच विविध आकाराचे माठ किवा भांडी आपल्याला मिळतात. या सर्वांना जर संस्काराची गरज आहे तर मानवाला देखील संस्काराची गरज आहे हे मान्य करावेच लागेल.

आरती डिंगोरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *