नाशिक : प्रतिनिधी
शिवसेनेत झालेल्या बंडामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच नाशिकमध्ये येत शिव संवाद मेळावा घेतला. यावेळी शिवसैनिकांचा जबरदस्त
प्रतिसाद मिळाला. दरम्यान रविवारी (दि. 24) बंडानंतर नाशिक आणि मालेगावच्या नगरसेवकांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी नाशिकसह मालेगावच्या सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी साहेब आम्ही तुमच्या सोबत असल्याचे पक्ष प्रमुख उद्भव ठाकरे यांना सांगितले.
जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, गटनेते विलास शिंदे, या नेत्यांसह सर्वच महत्वाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते. या भेटीबद्दल विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते म्हणाले, नाशिकची शिवसेना एकसंघ आहे. प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता खरं तर नाही. मात्र कोर्टातली प्रक्रिया आहे म्हणून लिहून दिले आहे. आज मातोश्रीवर यायला मिळालं याचा आनंद आहे. ज्यांना निवडून दिलं ते गेले मात्र ज्यांनी त्यांना निवडून दिलं ते शिवसैनिक जागेवरच आहेत. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत उद्धव ठाकरे यांची हीच खरी शिवसेना आहे. असं प्रतिज्ञापत्रात आम्ही लिहून दिलं. शिवाय आम्ही उद्धव ठाकरे यांना आमच्या शहरासाठी वेळ मागितला आहे. नाशिकचे सर्व नगरसेवक आणि इतर असे एकूण 39 नगसेवकांनी यावेळी मातोश्रीवर उपस्थित होते. सर्व नगरसेवकांचे प्रतिज्ञापत्र या वेळी लिहून घेण्यात आले. ज्यात झालेल्या सत्तांतरानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा काढली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात सामील झाल्याने, त्यांच्या मतदारसंघातील दुसऱ्या फळीतील नेते आता सक्रीय होतांना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेमुळे दुसऱ्या फळीला बळ मिळत असून, या यात्रेतील उत्साह त्यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. ठिक-ठिकाणी शिवसंवाद यात्रेला होणारी गर्दी पाहता शिवसेना पुन्हा जोमाने उभा राहण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोलले जात आहे. आधी मालेगाव शहर आणि नांदगावच्या आमदार आणि नंतर खासदार हेमंत गोडसे यांनी बंड केल्यानं नाशिकच्या शिवसेनेत फूट पडलीय. यातून पक्ष सावरण्यासाठी नाशिक शहर आणि जिल्ह्य़ातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावर चर्चा केली. त्यांच्याकडून शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचं शपथपत्रही भरून घेण्यात आलं.