नाशिक ः प्रतिनिधी
गणरायापाठोपाठ गौराईंचे येत्या रविवारी (दि. 31) सोनपावलांनी आगमन होणार आहे. गौरीपूजन दि. 1 सप्टेंबरला होणार आहे. विसर्जन 2 तारखेला होईल. अनुराधा नक्षत्रावर गौराईंचे पूजन केले जाते. तीन दिवसांच्या माहेरपणासाठी महालक्ष्मी पूजन केले जाणार आहे. गौरींचेे आगमन, भोजन आणि निरोप दिला जाणार आहे.
गौरीपूजनाचा उत्साह घराघरांत दिसून येत आहे. गेल्या महिनाभरापासून गौरींच्या आगमनासाठी महिलावर्गासह कुटुंबीयांची तयारी सुरू आहे.
माहेरपणासाठी आलेल्या ज्येष्ठा, कनिष्ठा गौरींच्या पूजनात कोणतीच कमतरता राहू नये यासाठी महिला आणि घरातील पुरुष मंडळींसह बच्चेकंपनीही खारीचा वाटा उचलताना दिसत आहेत. महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी भाजीपाला, फळे, फुलेे खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. ज्येष्ठा, कनिष्ठांच्या सरबराईसाठी विविध प्रकारचा फराळ,
फळे, नैवेद्यासाठी तिन्ही दिवसांच्या वेगवेगळ्या भाज्या आदींचे नियोजन केले जात आहे. आवाहनाच्या आदल्या दिवशी सर्व तयारी पूर्ण करण्यात येईल. माहेरवाशिणींप्रमाणे घराघरांत आज गौराईचे स्वागत केले जाणार आहे. प्रत्येकाच्या परंपरेनुसार कोणाकडे उभ्या, बसलेल्या किंवा खड्याच्याही गौरी पूजल्या जातात. स्थापना, विधिवत पूजन आणि नैवेद्य, आरती केली जाते. पहिल्या दिवशी साधा नैवेद्य, दुसर्या दिवशी पुरणपोळी आणि सोळा भाज्यांचा नैवेद्य, तर निरोपाच्या दिवशी आंबिल कथिलाचा नैवेद्य दाखविला जातो.