घोटी-त्र्यंबकेश्वर वाढीव रस्त्याचा प्रश्न; पोलिसांनी शेतकर्यांना घेतले ताब्यात
घोटी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील घोटी- त्र्यंबकेश्वर रस्त्याबाबत इगतपुरी तालुका कृती समितीतर्फे गेल्या एकवीस दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असून, शुक्रवारी (दि. 5) पहिने येथे मोजणी सुरू असताना कृती समितीतर्फे मोजणी अधिकार्यांना परत पाठवले. मात्र, पोलीस प्रशासनाने दबाव टाकत आंदोलकांना ताब्यात घेऊन उपोषणस्थळी परत सोडून दिले आहे.
दरम्यान, शेतकरी कृती समितीतर्फे पोलीस प्रशासन व भूसंपादन अधिकार्यांचा निषेध करण्यात आला. प्रशासनाने दंडुकेशाहीचा वापर केला तर वैतरणा धरणात जलसमाधी घेण्यात येईल, असा इशारा शेतकरी कृती समितीने दिला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या कुटुंबीयांनीदेखील प्रशासनाचा निषेध नोंदवत कुटुंबप्रमुखांच्या जीवाला काही झाले तर पोलीस प्रशासन व भूसंपादन अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे घोटी-त्र्यंबकेश्वर परिसरात धरणामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित झाल्या असताना पुन्हा वाढीव रस्त्यात 22 मीटर दोन्ही बाजूंनी संपादन करून शेतकर्यांच्या रोजीरोटीवर पाय देण्याचे काम प्रशासन करत असल्याचा आरोप माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी केला आहे.
दरम्यान, पोलिसांना निवेदन देत वैतरणा धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे. मोजणीला सुरुवात केली तर कृती समितीने थेट इशारा देत प्रशासनाला जबाबदार धरले आहे. यावेळी पोलीस प्रशासनाने माजी आमदार मेंगाळ यांच्यासह शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष नागेश गायकर, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस उमेश खातळे, सचिव नागेश गायकर, कुंडलिक जमधडे, किसन गायकर, गणपत खकाळे, राजेंद्र गायकर, भरत बरकले, अक्षय भोर, विवेक कुटके, ज्ञानेश्वर महाले, अक्षय गायकर, नवनाथ कोठुळे, हरिभाऊ अंबपुरे, संतोष अंबपुरे, मयूर कमलाकर, भाऊराव दगळे, गणेश महाले, बाजीराव तांबे, गणेश वाजे आदींसह शेतकर्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.