स्मार्ट सिटीने हत्या केलेल्या वारसा स्थळांना श्रद्धांजली
पंचवटी : वार्ताहर
स्मार्ट सिटी कडून रामकुंडासह गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत. हे काम केले जात असताना, यशवंतराव पटांगण जवळील पुरातन दगडी घाट उध्वस्त करण्यात आला. तसेच या कामात गणपतीची मूर्ती भंग पावली असून, अनेक छोट्या मोठ्या मंदिरांना तडे गेले आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.१०) गोदाप्रेमी नाशिककरांनी स्मार्ट सिटीने हत्या केलेल्या वारसा स्थळांना श्रद्धांजली अर्पण करून आगळेवेगळे आंदोलन केले. याप्रसंगी स्मार्ट सिटी अधिकारी उपस्थित झाले असता, त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. आठ दिवसांत यावर तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
गोदाघाटावरील यशवंतराव महाराज पटांगण लगत स्मार्ट सिटीकडून उध्वस्त करण्यात आलेला साडे सहाशे वर्ष पुरातन दगडी घाट परिसरात शनिवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता हे वारसा स्थळांना श्रद्धांजली आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी गोदाप्रेमी देवांग जानी, मामा राजवाडे, अंबादास खैरे, कल्पना पांडे, रामसिंग बावरी, योगेश बर्वे, कृष्णकुमार नेरकर, रघुनंदन मुठे, नंदू पवार, धनंजय पुजारी, महेश महंकाळे, सुनील महंकाळे, प्रफुल्ल संचेती, प्रवीण भाटे, नवनाथ जाधव, प्रा.सचिन आहिरे यांच्यासह शेकडो गोदाप्रेमी नाशिककर सहभागी झाले होते. यावेळी देवांग जानी यांनी सांगितले की, होळकर पुल ते गाडगे महाराज पुलापर्यंत सुमारे ६४ कोटींचे काम सुरू आहेत. या कामात मंदिरातील मुर्त्यांची हेळसांड, पुरातन दगडी घाट पायऱ्यांची तोडफोड केली जात आहे. सामान्य नागरिकांना काम करताना पुर रेषेचे कारण सांगुन घर बांधकाम अथवा दुरुस्ती करण्यास परवानगी नाकारली जात असल्याचे जानी यांनी सांगितले. पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या निलकंठेश्वर महादेव मंदिर परिसरात स्मार्ट सिटीने पुरातत्व विभागाची परवानगी का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित केला. तर स्मार्ट सिटीच्या वतीने अनेक कामे शहरभर सुरु आहे. ही कामे मनमानी पद्धतीने सुरु असल्याने, त्याचा त्रास सामान्य नाशिककरांना सहन करावा लागत आहे. नाशिकच्या वैभवात भर घालण्याऐवजी स्मार्ट सिटीचे अधिकारी नाशिकची ओळख तसेच प्राचीन इतिहास पुसण्याचे पाप करीत आहे. यापुढे नाशिकच्या इतिहासाला हात लावून छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा मामा राजवाडे यांनी बोलताना दिला. यावेळी स्मार्ट सिटीचे अधिकारी या अनोख्या आंदोलन प्रसंगी उपस्थित झाले असता, त्यांना निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, आंदोलन स्थळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सीताराम कोल्हे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
अनोखे आंदोलन
स्मार्ट सिटीकडून तोडण्यात आलेल्या दगडी घाटावर पुष्पहार अर्पण करून गोदाप्रेमी नाशिककरांनी अनोखी श्रद्धांजली वाहिली. स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना, उध्वस्त करण्यात आलेल्या याच पुरातन दगडी घाटावर पुढील आठ दिवसांत बैठक बोलावून सदर कामे पूर्ववत करून देण्यासंदर्भात आश्वस्त करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनातील नाशिककरांच्या प्रमुख मागण्या !
स्मार्ट सिटी कंपनीने तोडलेला गोदावरी नदी पात्रातील देवीचा सांडवा पूर्ववत बांधून द्यावा. यशवंत महाराज पटांगण येथे तोडलेल्या पुरातन दगडी पायऱ्या पुरातन पद्धतीनेच बसवून द्याव्या. येथील तोडलेली गणपतीची मूर्ती विधिवत तयार करून पुन:स्थापित करावी. सांडवा तोडताना छोट्या मंदिरांना भेगा पडलेल्या आहेत त्याची दुरस्ती करून द्यावी. गोपिकाबाई तास येथे पायऱ्यांवर कोरीव कासव असून, त्याचे संरक्षण व जतन करावे. नदीपात्रातील प्राचीन कुंडातील उर्वरित तळ सिमेंट काँक्रिट तात्काळ काढावे. नदीतील काँक्रीट काढून प्राचीन सतरा कुंडाची निर्मिती करून गोदाघाटाला पुनर्वैभव प्राप्त करून द्यावे. गोदाघाट परिसरातील हेरिटेज अस्तित्व अबाधित ठेवून पुढील कामे करावी.
स्मार्टसिटीच्या वतीने अनेक कामे शहरभर सुरु आहे . मात्र,हि कामे मनमानी पद्धतीने सुरु असल्याने त्याचा त्रास सामान्य नाशिककरांना सहन करावा लागत आहे . नाशिकच्या वैभवात भर घालण्याऐवजी स्मार्टसिटीचे अधिकारी नाशिकची ओळख आणि त्याचा प्राचीन इतिहास पुसण्याचे पाप करीत असल्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे . यापुढे नाशिकच्या इतिहासाला हात लावून छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल .
मामा राजवाडे