ग्रामस्थांचा दीड तास रास्ता रोको; गतिरोधक व सुरक्षा उपायांची मागणी
मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील वडगाव येथे मालेगाव-कुसुंबा रस्त्यावर रविवारी (दि. 14) सकाळी साडेनऊ ते दहा वाजेदरम्यान भरधाव दुचाकीने धडक दिल्याने सातवर्षीय बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी तब्बल दीड तास रास्ता रोको आंदोलन केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
कल्याणी शरद खैरनार (वय 7) ही बालिका आजी व बहिणीसोबत रस्त्याच्या कडेला पायी जात असताना मागून वेगात आलेल्या दुचाकी (एमएच 41 बीके 6342)ने तिला जोरदार धडक दिली. या अपघातात कल्याणीच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाली असून, तिला तातडीने मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. मालेगाव-कुसुंबा हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, वडगाव परिसरात यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. वेगमर्यादा पाळली जात नसणे, गतिरोधकांचा अभाव तसेच रस्त्याच्या कडेला कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला.
अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून रास्ता रोको केला. गतिरोधक बसविणे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोखंडी डिव्हायडर उभारणे तसेच वेगमर्यादा दर्शविणारे फलक तातडीने लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामुळे मालेगाव-कुसुंबा रस्त्यावरील वाहतूक काही काळ पूर्णतः ठप्प झाली होती.घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलीस ठाण्याचे एपीआय पुरुषोत्तम शिरसाठ यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. योग्य कार्यवाहीचे आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व वाहतूक सुरळीत केली. मात्र, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.