पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांवर दहावीच्या मुलांकडून लैंगिक अत्याचार

इगतपुरीच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार, अधीक्षकांसह सात जणांवर गुन्हा दाखल

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी शहरातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांसोबत धक्कादायक घटना समोर आली आहे. वसतिगृहातील दहावीत शिकणार्‍या काही विद्यार्थ्यांनी याच वसतिगृहातील पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
शहरातील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील दहावीतील सात विधिसंघर्षित विद्यार्थ्यांनी याच वसतिगृहातील अल्पवयीन विद्यार्थ्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या गैरप्रकाराने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी घटनेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी वसतिगृह अधीक्षक सुशांत दुधसागरे यांच्यासह सात विधिसंघर्षित विद्यार्थ्यांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी भेट देऊन पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांना मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना केल्या, या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याच्या सूचना केल्या. गेल्या सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या भीतीपोटी पीडित मुलांनी या प्रकाराची वाच्यता केली नाही. दरम्यान, वसतिगृह अधीक्षक दुधसागरे यांना पीडित मुलांनी माहिती दिली होती. मात्र त्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. अल्पवयीन विद्यार्थ्यांना गुंगीचे औषध, भांगेच्या गोळ्या देऊन वसतिगृहाबाहेरील झुडपात बळजबरीने नेऊन त्यांच्याशी वेळोवेळी अनैसर्गिक लैंगिक संबंध केले. याप्रकरणी संशयित सात विधिसंघर्षित विद्यार्थी व वसतिगृह अधीक्षकाविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचार व महाराष्ट्र आणि रॅगिंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी पोलीस निरीक्षक आहिरराव उपनिरीक्षक कांचन भोजने, गोपनीय विभागाचे हवालदार निलेश देवराज तपास करीत आहेत. दरम्यान, वसतिगृहातील संबंधित विद्यार्थ्यांना घोटी व इगतपुरी शहरातील कोणत्या मेडिकलमधून गुंगीच्या गोळ्या व भांगेच्या गोळ्या कोण पुरवत होते. हे शोधण्याचे आता पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.

दिवाळीपासून आमच्यावर बळजबरीने अत्याचार सुरू होता. वसतिगृहातील मोठे विद्यार्थी आम्हाला मारहाण करत गुंगीच्या गोळ्या देऊन निर्जनस्थळी नेत अत्याचार करीत असत. कोणालाही काही सांगितल्यास मारण्याची धमकी देत असल्याने आम्ही खूप घाबरलो होतो.
-पीडित विद्यार्थी

गुन्ह्यातील दहावीत शिकणार्‍या सात विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. 4) ताब्यात घेतल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांची इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. या सर्व विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि. 5) नाशिक येथील प्रधान बाल न्यायालय मंडळात हजर करणार आहे. वसतिगृह अधीक्षकांच्या जबाबानंतर सदर गुन्ह्यात हलगर्जी करणार्‍या वसतिगृहातील चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
– सारिका अहिरराव, पोलीस निरीक्षक, इगतपुरी

माझी नेमणूक या वसतिगृहात 26 जानेवारी 2026 रोजी झाली होती. हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. मात्र माझ्या कानावर हा प्रकार आल्यावर मी वसतिगृहातील काम पाहणार्‍या संबंधितांना सांगितला होता. मात्र मला गप्प राहण्याची धमकी दिल्यामुळे मी सदर प्रकार विद्यार्थ्यांच्या पालकांना सांगितल्यानंतरच पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यामुळे या प्रकरणाचा माझ्याशी काहीही संबंध नाही.
– सुशांत दुधसागरे, वसतिगृह अधीक्षक

फॉरेन्सिक पथकाला पाचारण
वसतिगृहाच्या बाहेर दोनशे मीटर अंतरावर रेल्वेची पडिक जागा असून, या ठिकाणी झाडेझुडपे व वेली आहेत. याच झाडेझुडपे व वेलींचा आधार घेऊन संबंधित विद्यार्थ्यांनी पाच ते सात झोपड्या बनवल्याचे आढळून आले. याठिकाणी फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. ते येथे नेमके काय घडत होते, याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.

Sexual assault on students of class 5 to 7 by class 10 boys

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *