गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई
सिडको : वार्ताहर
एका अल्पवयीन मुलाकडे तीन चॉपर, एक कुकरी आढळून आली. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पथकाने या अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून शस्त्रास्त्रे जप्त केली.
गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस नाईक चंद्रकांत गवळी यांना खबर्यांकडून गोपनीय माहिती मिळाली कि,दातीर चाळ, कृष्णनगर, अंबड येथे राहणार्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाकडे धारधार शस्त्रे आहेत. गवळी यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना दिली. उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार राजेंद्र घुमरे, विजय वरंदळ, नंदू नांदुर्डीकर, पोलीस नाईक चंद्रकांत गवळी, सुनील आहेर,मधुकर साबळे आदींच्या पथकाने सापळा रचून सदर अल्पवयीन संशयिताला चॉपरसह ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आणखी दोन चॉपर व एक कुकरी लपून ठेवल्याचे सांगितले. त्यावरून संशयिताकडून दोन चॉपर व एक कुकरी असे एकूण 3 चॉपर व 1 कुकरी असे 4 हत्यार जप्त करण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडे या सर्व हत्यारांबाबत विचारपूस केली असता त्याने सदरची हत्यारे रेकॉर्डवरील गुन्हेगार विनोद माधव मगर याची असून त्याने ते लपून ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले.याप्रकरणी सदर अल्पवयीन संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आले असून त्याला पुढील तपासासाठी अंबड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.