शहापूर: साजिद शेख
पन्नास हजार रुपये दिल्यास त्याचे पाच लाख रुपये करुन देतो असे सांगून दोन भामट्यांनी एका महिलेची फसवणूक केली. त्या महिलेला लहान मुलांच्या खेळण्यातील पैसे देण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे, जादा पैशांसाठी तिने दागिने विकून त्या भामट्यांना पैसे गोळाकरून दिले होते.
फसवणुक झालेली ४५ वर्षीय महिला बदलापूरमध्ये राहते. ती घरकाम करते, तर तिचा मुलगा एका कंपनीत कामाला आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होतो. महिला इन्स्टाग्राम हे ॲप वापरत असताना एक जाहीरात तिला दिसली. त्यामध्ये ५० हजार द्या, आम्ही पाच लाख रुपये करुन देतो असे लिहीण्यात आले होते. तसेच, त्याखाली मोबाईल क्रमांक देण्यात आले होते. महिलेने त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्या भामट्यांनी तिला जादा मोबदला देतो असे सांगितले. त्यामुळे तिने त्या भामट्यांना पैसे देण्याचे ठरविले.
११ जुलैला तिने सोन्याचे दागिने सराफाकडे गहाण ठेऊन ३० हजार रुपये घेतले. तसेच १० हजार रुपये मुलाच्या वेतनातील घेतले. असे एकूण ४० हजार रुपये जमा झाल्यानंतर तिने त्या भामट्यांना संपर्क साधला. त्या भामट्यांनी तिला १२ जुलैला पैसे घेऊन ठाणे रेल्वे स्थानक येथे बोलावले. महिला ठाणे रेल्वे स्थानकात आली असता, सुरुवातीला त्यांनी तिला ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला उभे राहण्यास सांगितले. एक तास ताटकळत ठेवल्यानंतर तिला पुन्हा ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील गावदेवी मंदिराजवळ बोलाविले. महिला गावदेवी मंदिराच्या येथे पायी जात असताना एका दुचाकीवर दोघे आले. यातील दोघांनी डोक्यात हेल्मेट घातले होते आणि तोंडाला रुमाल बांधला होता. त्यांनी महिलेकडून ४० हजार रुपये घेतले. तसेच तिच्या हातात कागदाने बंदिस्त केलेले एक बंडल दिले. यामध्ये पैसे असल्याचे तिला सांगितले. त्यानंतर दोघेही तेथून निघून गेले.काही वेळाने त्यांनी महिलेला पुन्हा मोबाईलवर संपर्क साधला आणि पैशांचे बंडल घरी गेल्यानंतर उघडण्यास सांगितले. तसे केले नाही तर पोलीस पकडतील अशी भिती तिला दाखविली. त्यामुळे महिलेने ते बंडल उघडले नाही. महिला घरी पोहचली असता, तिने पैशांचे बंडल उघडून पाहिले. त्यात खेळण्याचे पैसे असल्याचे उघड झाले. महिलेने याबाबतची माहिती मुलाला दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.