राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद शिंदे यांचे प्रशासनाला जागे करण्यासाठी अनोखे आंदोलन
सिन्नर : प्रतिनिधी
पांढुर्ली ते भगूर रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींकडून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि.26) सरण रचून पांढुर्ली चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांना नाशिकला जोडण्यासाठी पांढुर्ली ते भगूर हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. सुमारे सहा किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.अनेक ठिकाणी रस्त्यावर डांबरही दिसत नाही. या मार्गाने चारचाकी आणि दुचाकी चालणेही अवघड होऊन बसले आहे.
अनेकदा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निवेदने देऊन व आंदोलने करूनही रस्ता दुरुस्त होत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने
चौफुलीवर सरण रचून अनोखे रस्ता रोको आंदोलन केले. शरद शिंदे यांनी आमदार आणि खासदार या दोघांवर टीकास्त्र सोडून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
नायब तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी चर्चा करून निवेदन स्वीकारले. नायब तहसीलदारांंनी निवेदन स्वीकारत वरिष्ठांकडे मागण्या पोहोचवून न्याय देण्याची हमी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. न्याय न मिळाल्यास बेेमुदत उपोषणाचा इशारा शिंदे यांनी दिला. सिन्नर – डुबेरे – ठाणगाव रस्ता व घोटी महामार्गावर हरसुले, लोणारवाडी, बेलू, आगासखिंड गावाजळ गतिरोधक टाकण्याची मागणी शिंदे यांनी केली. भगूर ते पांढुर्ली रस्तादुरुस्ती करून खड्डेमुक्त रस्ता करावा, सिन्नर- ठाणगाव रस्ता दुरुस्त करण्यात यावा, घोटी व ठाणगाव मार्गावर गतिरोधक बसविण्यात यावे, या मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
रास्ता रोको आंदोलनास शरद शिंदे यांच्यासह पुंजाराम हारक, रतन तुपे, नारायण शेळके, शिवाजी गुंजाळ, नामदेव वाजे, नानासाहेब सोनकांबळे, राहुल रूपवते, कचरू कुंदे, परसराम हगवणे, शरद धनराव, अशोक कुंदे, गोरख वाघ, एकनाथ कुंदे, चिंधू गुंजाळ, योगेश रानडे, ऋषी कटारे, सजन वाजे, दादा दळवी, प्रकाश बरकले, भागुजी वाजे, वाळिबा हगवणे, शंकर हगवणे यांच्यासह परिसरातील गावांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दळणवळणावर परिणाम
सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली, शिवडा, घोरवड, विंचुरी दळवी, सावतानगर, आगासखिंड, बेलू, बोरखिंड, धोंडबार, औंढेवाडी या भागांतील नागरिकांना भगूर, नाशिकरोड व नाशिक येथे नेहमी कामानिमित्त जावे लागते. गेल्या दोन वर्षांत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील दळणवळण व्यवस्था पुरती कोलमडली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला आहे. अनेक जण जखमी होऊन जायबंदी झाले आहेत. अनेकांना कंबर, मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. या परिसरात भाजीपाला उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. शेतकर्यांना माल ने-आण करताना वाहनांना मोठी कसरत करावी लागतेे. दोन वर्षांपासून मागणी करूनही रस्तादुरुस्ती होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.