बाळासाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचे बाप : ना. भुसे

बाळासाहेब ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचे बाप : ना. भुसे

शिंदे गटाच्या मेळाव्यात शिवसेनेवर जोरदार टीका

नाशिक : गोरख काळे

शिवतीर्थांवर यंदा होणारी सभा ही विचारांची नव्हे तर टोमण्यांची सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कुणा एकाचे बाप नव्हते तर संपूर्ण महाराष्ट्राचे ते बाप आहेत आणि आपल्या देशाचे बाप छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेबांचा फोटो काढायला सांगणार्‍यांनी स्वतः शिवाजी महाराजांचे नाव न घेता निवडणूका लढवून दाखवाव्यात असे आव्हान मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
नाशिक शहरात शिवसेना शिंदे गटाचा पहिलाच मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. हेमंत गोडसे, आ. सुहास कांदे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, महानगरप्रमुख बंटी तिदमे, युवा सेनेचे योगेश म्हस्के यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.
यावेळी ना. भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच तीन महिन्यांच्या काळात केलेल्या कामांचा आढावा मांडला. त्याचबरोबर दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना आनंदाची बातमी मिळणार असून शेतकर्‍यांची दिवाळी उत्साहात साजरी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. निवडणूकीपुरतीच महापुरुषांची आठवण ठेवणारे हे निवडणूकांनंतर महापुरुषांना विसरत असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार खासदार आणि शिवसैनिकांना न भेटणारे आता सर्वांना भेटतात हे आनंदाचे आहे. मात्र याचे श्रेय हे शिंदे यांनाच असल्याचेही त्यांनी म्हटले.
यावेळी शिंदे गटाच्या शितल म्हात्रे म्हणाल्या की, पतंप्रधान मोदी आणि शहा यांचे फोटो लावून ज्यांनी निवडणूका लढल्या आणि नंतर सोनियांच्या मांडीला मांडी लावून सत्ता स्थापन केली. त्यामुळे तेच खरे गद्दार असून त्यांनी आता आम्हाला गद्दार म्हणू नये. आपले आमदार आणि खासदार आपल्यातून जात असतांना आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. .
दसर्‍याला शिवतीर्थावर शिवसेनेचा मेळावा होतो त्यावेळी सर्वजण विचारांचे सोने लुटण्यासाठी जात होते, परंतु आता सोनियाचे विचार ऐकण्यासाठी जावे लागणार आहे. त्यामुळेच खरे बाळासाहेब विचार हे बीकेसी मैदानावर ऐकायला मिळणार असल्याने आपण बीकेसी मैदानावरच गेले पाहिजे असेे आवाहन त्;यांनी केले. शिवसेनेतून 40 आमदार 13 खासदार बाहेर पडत असतांना सुद्धा उद्धव ठाकरेंनी आत्मपरिक्षण केले नाही तर टोमणेबाजी करण्यास सुरुवात केली. अडीच वर्षांत ठाकरे कधीही मंत्रालयात गेले नाही. आमदार, शिवसैनिक, पदाधिकारी यांना मातोश्रीवर जाण्यापूर्वी कोरोनाचा रिपोर्ट द्यावा लागत होता. परंतु वर्षा बंगला सोडतांना ठाकरे स्वतः पॉझिटीव्ह होते मात्र त्यावेळी सत्ता गेल्याने कोरोनाचा विसर पडला असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी शिवसेना आणि मनसेतून आलेल्या अनेकांना यावेळी प्रवेश देण्यात आला.

 

महानगरप्रमुख बंटी तिदमे भावूक

यावेळी ना. भुसे यांनी शिवसेनेत असताना बंटी तिदमे यांना कसा पक्षातीलच लोकानी त्रास दिला, चांगले काम करत असतानाही केवळ स्वार्थापोटी तिदमे यांना त्रास दिला गेला. या बद्दल उपस्थितांना सांगितले.
झालेल्या अन्यायाबाबत ना. भुसे बोलत असताना महानगरप्रमुख बंटी तिदमे यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. दरम्यान शिवसेना सोडताना माजी नगरसेवक बंटी तिदमे यांनी देखील आपल्याला वेळोवेळी डावलत असल्याचे सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *