जिल्ह्यातील 15 केंद्रे बंद पडल्याची चर्चा
नाशिक : प्रतिनिधी
गरजू, रोजंदारी कामगार, विद्यार्थी आणि निराधार नागरिकांना अल्प दरात जेवण उपलब्ध करून देणारी शिवभोजन योजना सध्या आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. मे 2025 पासून अनुदान न मिळाल्याने जिल्ह्यातील अनेक केंद्रचालकांवर आर्थिक ताण वाढला असून, 123 पैकी सुमारे 15 केंद्रे निधीअभावी बंद असल्याची चर्चा रंगली आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण 123 शिवभोजन केंद्रे कार्यरत आहेत. त्यापैकी 73 केंद्रे शहरी भागात, तर 50 केंद्रे ग्रामीण भागात आहेत. दररोज सुमारे 14 ते 15 हजार गरजू नागरिक या योजनेचा लाभ घेतात. महिन्याला सुमारे 4 लाख 50 हजार थाळ्यांचे वितरण केले जाते. शहरातील केंद्रांवर अंदाजे 2 लाख 73 हजार, तर ग्रामीण भागात सुमारे 1 लाख 76 हजार थाळ्यांचे
वाटप होते.
या योजनेंतर्गत 10 रुपयांत दोन पोळ्या, भाजी, भात आणि आमटी किंवा वरण अशी थाळी दिली जाते. प्रत्येक थाळीमागे शासनाकडून 40 रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र, अनुदान रखडल्याने केंद्रचालकांना स्वतःच्या भांडवलातून खर्च करावा लागत असून, काहींनी कर्जाचा आधार घेतल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, राज्यातील आर्थिक ताण आणि इतर योजनांवरील खर्चामुळे निधी वितरणात विलंब होत असल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी गैरप्रकारांच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. मात्र, योजनेचा लाभ घेणार्या हजारो गरजूंसाठी ही योजना जीवनरेखा ठरत असल्याने शासनाने तातडीने प्रलंबित अनुदान वितरित करून केंद्रांना दिलासा द्यावा, अशी मागणी केंद्रचालक व लाभार्थ्यांकडून होत आहे.