शिवजयंती उत्सवाने शहरात उसळला चैतन्याचा महासागर

’जय जिजाऊ जय शिवराय’, ’जय भवानी, जय शिवाजी’ यांसारख्या उत्स्फूर्त घोषणा, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषेतील बालके, महिला व पुरुष, सजीव देखाव्यांचे सादरीकरण, अशा चैतन्यमय वातावरणातील शिवजयंतीच्या मुख्य मिरवणुकीने नाशिककरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित शहराच्या मुख्य मिरवणुकीला पारंपरिक ठिकाण वाकडी बारव येथून प्रारंभ झाला होता. या मिरवणुकीत छत्रपती सेना, हिंदवी स्वर स्वराज्य प्रतिष्ठान, शिवसाई मित्रमंडळ, शिवस्य जनसेवा समिती, लष्कर-ए-शिवबा ग्रुपप्रणीत जनता मित्रमंडळ, छत्रपती शिवाजी महाराज व संतशिरोमणी गुरू रविदास महाराज संयुक्त जयंती उत्सव, अर्जुन क्रीडा मित्रमंडळ आदी मंडळांचे आठ ते नऊ चित्ररथ व देखाव्यांचा समावेश होता. सजवलेल्या वाहनावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, पारंपरिक वेशातील मावळे, लहानग्यांनी केलेल्या छत्रपती शिवराय व जिजामाता यांची वेशभूषा यामुळे अवघी मिरवणूक शिवमय झाली होती.
नाशिकरोड परिसरातही शिवजयंतीनिमित्त जनसागर उसळला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव सोहळा समितीतर्फे आयोजित उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसली. त्याचप्रमाणे सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटी या भागांतही ठिकठिकाणी शिवजयंती उत्सव अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात आला.
इतिहासाचे साक्षीदार, स्वराज्याचे वंशज एकाच मंचावर
इतिहास केवळ पुस्तकांतून नव्हे,तर प्रत्यक्ष अनुभवातून जिवंत होऊ शकतो, याची साक्ष नाशिककरांनी अनुभवली. अशोक स्तंभ परिसरात आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात शिवरायांच्या स्वराज्यासाठी लढलेल्या वीर मावळ्यांच्या वंशजांची एकाच मंचावर उपस्थिती पाहून संपूर्ण परिसर शिवकालीन तेजाने उजळून निघाला. इतिहासाचे साक्षीदार आणि स्वराज्याचे वंशज एकत्र आल्याने हा सोहळा नाशिकच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण ठरला. अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवरायांची भव्य व देखणी मूर्ती साकारण्यात आली होती. मात्र, या वर्षीच्या सोहळ्याला वेगळेपणाची किनार होती. हिंदवी स्वराज्यस्थापनेसाठी प्राणांची आहुती देणार्‍या वीर मावळ्यांच्या घराण्यांचे वारस- येसाजी कंक, कान्होजी जेधे, हंबीरराव मोहिते, तानाजी मालुसरे, शेलारमामा, राजे भोसले, होळकर, बारगळ, पेठे, राजेबहाद्दर, विंचूरकर आदी घराण्यांचे वंशज पहिल्यांदाच एकत्र सन्मानित झाले. या कार्यक्रमातील सर्वांत भावनिक क्षण म्हणजे, 50 गडकोट आणि नऊ नद्यांच्या पवित्र जलाने महाराजांना अभिषेक केल्यानंतर सर्व वंशजांनी एकत्र येऊन केलेली महाआरती. भक्ती व शक्ती यांचा अद्भुत संगम साधणार्‍या या क्षणाने उपस्थित शिवभक्तांचे डोळे अक्षरक्षः पाणावले.
आधुनिक हिरकणींनी नऊवारीत
घेतला गड चढाईचा अनुभव
आईच्या प्रेमाचे आणि धाडसाचे अद्भुुत उदाहरण म्हणजे हिरकणी होय. रायगडाच्या इतिहासात हिरकणीचे नाव अजरामर आहे. गडाच्या कड्यावरून खोल दरीत उतरत आपल्या लेकरासाठी उतरणारी ही माता आजही प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहे. याच परंपरेला साजेशी ’हिरकणी’ ही स्पर्धा आदर्श शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती सेनेतर्फे आयोजित करण्यात आला होती. नऊवारी साडी नेसून 21 फूट उंच रॉक क्लाइम्बिंगच्या (गड चढाई) या हिरकणी स्पर्धेत 240 महिला सहभागी झाल्या. सीबीएसजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात (शिवतीर्थ) ही स्पर्धा पार पडली. सकाळी हिरकणी स्पर्धा पार पडल्यानंतर सायंकाळी महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावरील पोवाडे, नृत्य आणि ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धेने उपस्थितांची मने जिंकली.
महाशिवरात्रीनिमित्त शिव मंदिरे
गजबजली, भक्तीचा उत्सव
महाशिवरात्रीनिमित्त शहर व परिसरातील शिवभक्तांनी अनेक शिवालयांत दर्शन घेत विधिवत पूजाअर्चा केली. कपालेश्वर, सोमेश्वर मंदिर व त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी राज्य-परराज्यातून भाविकांनी उपस्थिती लावली. कपालेश्वर मंदिरापासूनची रांग शनिवारी मध्यरात्री थेट गोदाकाठापर्यंत लांबत गेली. गंगापूर रस्त्यावर सोमेश्वर मंदिरातही भाविकांची शनिवारी मध्यरात्रीपासूनच रांग लागलेली होती. सोमेश्वर मंदिरातही पहाटेपासून पूजाअर्चा, रुद्राभिषेक झाल्यानंतर भाविकांची गर्दी वाढतच गेली. शहरासह सिडको, सातपूर, गंगापूर रोड, इंदिरानगर, नाशिकरोड, पंचवटी या भागातील शिवमंदिरांतही दर्शनासाठी भक्तांची गर्दी उसळली होती.
महापौरांचा आगळ्यावेगळ्या
पद्धतीने सन्मान
शहरात वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी नाशिक स्कूल असोसिएशनतर्फे आदर्श उपक्रम राबविण्यात आला. पुष्पगुच्छ न देता थेट पाचशे बालकथांची पुस्तके भेट देऊन महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचा वेगवेगळ्या पद्धतीने सन्मान तथा सत्कार करण्यात आला. शहरातील 40 शाळांचे विश्वस्त व प्राचार्य यांच्या उपस्थितीत महापौर निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. हिमगौरी आडके यांनी यापूर्वी स्कूल असोसिएशनच्या अध्यक्षा म्हणूनही कार्य केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सहकार्‍यांपैकीच एक व्यक्ती शहराच्या सर्वोच्च नागरी पदावर विराजमान झाल्याचा अभिमान व्यक्त करत असोसिएशनतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला. आता ही पुस्तके महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना देणगी स्वरूपात देण्यात येणार असून, त्यामुळे वाचन चळवळीला बळ मिळणार आहे.
बाळ येशू यात्रेला दोन लाख
भाविकांची हजेरी
नाशिकरोड परिसरातील नेहरूनगर येथील बाळ येशू मंदिरात यात्रेनिमित्ताने पहिल्याच दिवशी सव्वादोन लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. मुंबई, गोवा, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, गुजरातमधून भाविक दर्शनासाठी आले होते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत महिला व पुरुषांनी रांगेत व शांततेत दर्शन घेऊन आपापल्या भाषेत प्रार्थना केली. नेहरूनगर येथे सन 1960 पासून बाळ येशू मंदिरात यात्रेचे आयोजन करण्यात येते. यंदा 67 वा उत्सव ख्रिस्ती बांधवांंनी साजरा केला.
अरुणा ढेरे यांचा अक्षय
पुरस्काराने सन्मान
साहित्य क्षेत्रात अतुलनीय विविध कामगिरीबद्दल दि न्यू एज्युकेशन सोसायटीतर्फे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे यांना सोमवारी (दि. 16) महाकवी कालिदास कलामंदिरात संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन यांच्या हस्ते अक्षय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना अरुणा ढेरे म्हणाल्या की, भाषेचा नुसता फुलोरा नको, तर भाषा हे केवळ माध्यम असून, त्यातील भावना, अनुभव महत्त्वाचा आहे. अभिजात मराठीचा गौरव करताना त्यातील मराठीपण जपणं महत्त्वाचं आहे. व्यासपीठावर रेखा कुलकर्णी, सचिव हेमंत बरकले, संयुक्त सचिव अनुराधा बस्ते, रवींद्र कदम आदी उपस्थित होते. 25 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि पैठणीने ढेरे यांना सन्मानित करण्यात आले.

Shiv Jayanti celebrations create an ocean of excitement in the city

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

3 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

3 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

3 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

3 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

3 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

3 hours ago