लक्ष्यवेध : प्रभाग-26
भाजप, शिवसेना शिंदे गटात उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा; पाणी, नालेसफाईची समस्या कायम
नाशिक महापालिका क्षेत्रातील प्रभाग 26 हा कष्टकरी, कामगार, शेतकरी, उच्चभ्रू असा संमिश्र वसाहतीचा परिसर आहे. या प्रभागात 2017 च्या मनपा निवडणुकीत भागवत अरोटे व हर्षदा गायकर या शिवसेनेकडून, तर दिलीप दातीर मनसेतर्फे व अलका अहिरे या भाजपातून विजयी झाल्या होत्या. मात्र, 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी दिलीप दातीर यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर प्रभागातील तिन्ही शिवसेनेचे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेले. मागील निवडणुकीत या प्रभागात शिवसेना, भाजपा, मनसे, माकपा, अशी लढत झाली होती. त्यात माकपा वगळता शिवसेना, भाजपा, मनसे या तिन्ही पक्षांना यश मिळाले होते.
गेल्या पाच वर्षांत बरेच पाणी वाहून गेले. राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शिवसेनेची शकले उडाली. मागील वेळेस शिवसेनेतून निवडून आलेले तिन्ही नगरसेवक आज शिंदे गटातील शिवसेनेत आहेत. त्यामुळे शिवसेना उबाठाला येथे नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत. भाजपाच्या अलका अहिरे या मागील वेळेस येथून निवडून आल्या होत्या. त्या आताही भाजपातच आहेत. पण उबाठाला नवीन उमेदवार द्यावे लागणार आहेत. बहुतांश कामगारबहुल मतदारसंघ असल्यामुळे या भागातील समस्या सोडविण्याचे आव्हान गेल्या पाच वर्षांत या भागातील नगरसेवकानी चांगल्यारीतीने पेलले आहे. सातपूर व अंबड अशा दोन औद्योगिक वसाहतींना जोडणारा हा प्रभाग आहे. त्यामुळे या भागात नवनवीन वसाहती उभ्या राहत आहेत. आशीर्वादनगर, बालाजी पार्क, पाटीलनगर या भागात रस्त्यांचे काँंक्रीटीकरण बाकी आहे. नवीन वसाहतींमध्ये सुविधा पुरविण्याचे काम मागील पाच वर्षांत या भागातून निवडून आलेले नगरसेवक भागवत आरोटे, अलका अहिरे व हर्षदा गायकर यांनी केले आहे. गेल्या पाच वर्षांत या भागातील राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे भाजपाकडून निवडणूक लढविणार्या इच्छुकांबरोबरच शिवसेना शिंदे गटातही उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा दिसून येत आहे. एकेकाळी या भागात मनसेचे बर्यापैकी वर्चस्व होते. काळानुरूप मनसेची संघटनात्मक बांधणी खिळखिळी झाली आहे. पूर्वी शिवसेना उबाठा गटातून निवडून आलेले आज सर्वजण शिंदे गटात स्थिरावले आहेत. त्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत युती झाल्यास जागावाटपाचा तिढा निर्माण होऊ शकतो. त्या तुलनेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस यांची येथे फारशी ताकद नाही. संघटनात्मक बांधणी तर औषधालाही नाही. मनसे काही प्रमाणात दिसते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना उबाठा, मनसे, शिवसेना शिंदे गट, माकपा, भाजपा, अशी लढत होणार आहे.
विद्यमान नगरसेवक

भागवत अरोटे,

हर्षदा गायकर,

अलका अहिरे,

मधुकर जाधव,
प्रभागातील समस्या
♦ शहरात दोन वेळा पाणी. प्रभागात मात्र एकवेळ पाणी.
♦ अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण नाही.
♦ प्रभागात पाण्याची समस्या.
♦ रस्ते खड्डेमय, डांबरीकरण झालेले नाही.
♦ कंटेनरचा विळखा कायम
♦ रस्त्यांवरील अनधिकृत व्यावसायिकांचे अतिक्रमण.
♦ डांबरीकरण झालेल्या रस्त्यांचा दर्जा निकृष्ट.
♦ नाल्याची साफसफाई नाही.
♦ मोकाट कुत्र्यांचा हिंस्त्रपणा वाढला
लोकसंख्या
लोकसंख्या ः 31,402
एकूण पुरुष ः 18,130
एकूण महिला ः 13,261
एकूण तृतीयपंथी ः 11
प्रभागाची व्याप्ती
खुटवडनगर, साळुंखेनगर, केवल पार्क, भंगार मार्केट, मळे परिसर, चुंचाळे, रामकृष्णनगर, संजीवनगर, भोर टाउनशिप, जाधव टाउनशिप, म्हाडा कॉलनी, आयटीआय पूल.
प्रभागात झालेली विकासकामे
♦ प्रभागात हॉस्पिटलची निर्मिती.
♦ प्रभागात अद्ययावत क्रीडांगण.
♦ तीन जलकुंभ, कामटवाडे व चुंचाळे.
♦ जुन्या रस्त्यांचे डांबरीकरण.
♦ आधुनिक नक्षत्र गार्डन, मुंडे गार्डन.
♦ पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन.
♦ 50 बाय 60 ची दोन सभागृहे.
♦ मळे परिसरात तीन पूल.
रखडलेली कामे
♦ नवीन वसाहतींमधील रस्ते.
♦ पाटील पार्कमुळे परिसरात रस्ते.
♦ रस्त्यांचे काम निकृष्ट.
♦ प्रभागात पाण्याचा प्रश्न गंभीर.
♦ साफसफाईचा प्रश्न.
♦ ड्रेनेजची कामे अपूर्ण.
♦ प्रशासनाचे विकासाकडे दुर्लक्ष
इच्छुक उमेदवार
दिलीप दातीर, भागवत अरोटे, हर्षदा गायकर, अलका अहिरे, मधुकर जाधव,
निवृत्ती इंगोले, सचिन भोर, संदीप तांबे, रवी पाटील, तानाजी जायभावे,
वसुधा कराड, गणेश पगार, अशोक पवार, अशोक पारखे, नंदिनी जाधव,
ज्ञानेश्वर बगडे, सद्दाम शेख, अश्फाक शेख, यशवंत पवार, पुष्पावती पवार,
रामदास मेदगे, नीलेश पाटील, निवृत्ती गोवर्धने, लखन कुमावत, निर्मला पवार,
दीपक पगारे, युवराज सैंदाणे
भंगार बाजार- नागरिक बेजार

या प्रभागातील भंगार बाजार हा नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. भंगार बाजार हटविण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. याच मुद्दयावर दिलीप दातीर या भागातून निवडूनही आले होते. त्यांनी या भंगार बाजारासाठी मोठा लढा दिला होता. पण या भंगार बाजाराने पुन्हा आपले बस्तान चांगलेच बसविले आहे. अंबड लिक रोडवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाट वस्ती असतानाच आता भंगार बाजारातील व्यावसायिक थेट रस्त्यापर्यंत अतिक्रमित झाले आहेत. महापालिकेला मात्र या भागातील अतिक्रमण दिसत नाही. रस्त्याच्या कडेला उभ्या राहणारे कंटेनर, ट्रकमुळे रस्ता अरुंद झाला आहे. सततच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे या समस्येकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.