आपल्या भारताच्या कणाकणात वास करणारे, रंकापासून राजापर्यंत सर्वांनाच प्रिय असलेले दैवत म्हणजे शंकर भगवान. महादेव भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करतात. भयभीत झालेल्या हतोत्साह झालेल्या शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करणारे महादेवांना भोळा सांब म्हटल्या जाते. भोळा म्हणजे कशावरही भाळणारा. साधे हर हर म्हटले तरी किंवा शिवलिंगावर एक बेलाचे पान वाहिले तरी प्रसन्न होतो. देवीदेवतांपासून ते मानवापर्यंत अनेक युगांपासून शंकराची पूजा केली जाते. शिवांना प्रिय असलेल्या वस्तू शिवलिंगावर अर्पण करून भक्त धन्यता मानतात तर महादेव त्यांची भोळी भक्ती पाहून प्रसन्न होतात. समुद्र मंथनातून बाहेर आलेले विष भोळ्या महादेवालाच प्रसन्न करून सर्वांनी प्यायला लावले होते. त्यामुळेच महादेवाचा कंठ निळा होऊन त्याचे नाव नीलकंठ पडले.
शिव भोळा चक्रवर्ती ।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम ।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष ।
शिव देखता प्रत्यक्ष॥
एका जनार्दनी शिव ।
निवारी कळीकाळाचा भेव॥
संत एकनाथ महाराजांनी भोळ्या शिवाला विश्वाचा राजा संबोधून त्यांचे नाव सतत चित्ती असते असे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर मुखाने शिवाचे नाव घेतले तरी त्या माणसाला काम क्रोध यांची बाधा होत नाही आणि चारही पुरुषार्थांची सिद्धी शिवामुळे प्राप्त होत असल्याचे सांगत शंकराला कलियुगाच्या भीतीपासून रक्षण करणारा म्हटले आहे.
माघ शुद्ध चतुर्दशीला शंभो, हर-हर महादेव असा नामघोष शिवालयांमधून ऐकू येत असतो. या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत केले जाते. उपवास, पूजा व जागरण ही या व्रतांची तीन अंग असून, ती सारख्याच महत्त्वाची आहेत. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प करून शिवाच्या देवळात जाऊन पुढील मंत्राने शिवाचे ध्यान केले जाते.
ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं
रत्नाकल्पोज्ज्वलाङ्गं परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम् ।
पद्यासीनं समन्तात्स्तुतंममरगणैर्व्याध्रकृतिं वसानं
विश्वाद्यं विश्वबीज निखिलभयहरम पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् ॥
यानंतर षोडशोपचारे पूजा आणि भवभवानीप्रीत्यर्थ तर्पण केल्या जाते. शिवाला एकशे आठ कमळं किंवा बेलाची पानं नाममंत्राने वाहतात. पुष्पांजली अर्पण करून अर्ध्य देऊन पूजासमर्पण, स्तोत्रपाठ व मूलमंत्राचा जप झाल्यावर शिवाच्या मस्तकावरील एक फूल काढून ते स्वत:च्या मस्तकावर ठेवावं आणि क्षमायाचना केली जाते. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असं विधान आहे. त्यांना यामपूजा असं म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालावं, अनुलेपन करतात. शंकराला प्रिय असलेले धोत्रा, आंबा व बेल यांची पत्रं, आंब्याचा मोहर,केवड्याचं कणीस महाशिवरात्रीला शिवाला अगत्याने वाहतात.
महाशिवरात्री संबंधित खालील कथा सांगितली जाते. एक पारधी होता त्याला दिवसभर शिकार मिळाली नाही, त्यामुळे उपाशी राहावे लागले. रात्री तरी एखादी शिकार मिळेल म्हणून तो बेलाच्या झाडावर लपून बसला, परंतु कोणीच सावज आले नाही. तेव्हा सहज चाळा म्हणून तो बेलाचे एक- एक पान तोडीत खाली टाकत होता. तेथे खाली धोत्र्याच्या झाडाखाली सांबाची पिंड होती. तिच्या धोतर्याची फुले गळून पडली होती. त्यावर आणखीन बिल्वपत्रांचा ढीग साचला. पहाटेच्या सुमारास तिथे नदीवर एक हरिणी पाणी पिण्याकरिता आली. तिच्यावर पारधी बांध सोडणारच इतक्यात ती म्हणाली, थांब, मी घरी जाऊन माझ्या पाडसाला पाजून परत येते. माझे ती लेकरू भुकेलेले आहे. मी आल्यावर मग तुम्हाला मार.
पारध्यानी तिच्यावर विश्वास ठेवला व तो झाडाखाली तिची वाट पाहत थांबला. तेवढ्यात ती हरिणी परत तिथे आली. ती आपल्या वचनाला जागली हे पाहून पारध्याला तिची दया आली. तिच्या कळवळा येऊन त्याने तिला घरी जाण्यास सांगितले. ती आनंदाने उड्या मारत निघून गेली. त्या दिवशी पारध्याला उपवास घडला, त्यात त्याच्या हातून शिवपूजा झाली. महादेवांनी त्याला पुढे शिवलोक दिला. हा दिवस माघ वद्य चतुर्दशीचा होता. तेव्हापासून महाशिवरात्र म्हणून तो प्रसिद्ध पावला. पारध्याकडून नकळत घडलेल्या शिवरात्रीच्या उपासनेमुळे त्याला मोक्ष मिळू शकतो, म्हणूनच आपणही महाशिवरात्रीचे औचित्य साधून शिवोपासना करायला हवी.
अनेक संतमहातम्यांनीसुद्धा भगवान शंकरांचे वर्णन आपल्या अभंगांतून केलेले आहे. वेळप्रसंगी विष प्राशन करुन ते पचवून सर्वांची काळजी घेणार्या भोलेनाथाचे वर्णन करताना समर्थ रामदास स्वामी आरतीत म्हणतात,
लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा ।
वीषे कण्ठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्य सुन्दर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥
अर्थात ब्रह्मांडातील ग्रहतार्यांच्या, शंकरा- आकाशमालांच्या माळा तुझ्या गळ्यात डोलत आहेत, समुद्रमंथनातून बाहेर पडलेलं विष प्राशन करून तुझा कंठ काळवंडला आहे, तुझ्या तिनही डोळ्यातून भयानक ज्वाळा बाहेर पडत आहेत. तुझ्या डोक्यावर पवित्र गंगा आहे. अशा देवाधिदेव शंकराचा जयजयकार असो.
कैलास पर्वतावर राहणार्या पार्वतीपती असलेल्या भोळ्या चक्रवर्ती भगवंताच्या पायांवर माझे दंडवत. जटेमध्ये गंगा धारण केलेल्या व भव्यकपाळी अर्धचंद्रकोर विराजमान असलेल्या महादेवाच्या नामस्मरणात जीव लागून मन दंग होऊ दे. देवाच्या दोन तेजस्वी नेत्रांच्या मध्ये असलेला तिसरा नेत्र वाईट गोष्टींचा नायनाट करण्यास सज्ज आहे.
समुद्रमंथनातून बाहेर आलेले काळे विष जगाच्या कल्याणासाठी या निळकंठाणे प्राशन केले असून त्यांच्या गळ्याभोवती सर्प व हातात त्रिशूळ आहे. सर्वांगाला विभूती भस्माचे लेपन केले असल्याने शोभायमान दिसणार्या शंकराच्या गळ्यात व दंडावर रुद्राक्षांच्या माळा असून हाती खापर घेतलेले प्रभू अखंड रामनाम जपत आहेत.गजचर्माचे वस्त्र परिधान करणारे हे भगवंत स्मशानात वास्तव्य करत असल्याने त्यांच्या आसपास भूतांचा वावर आहे अशा भोलेनाथाच्या नामस्मरणाने पापांचा नाश होऊन सुख लाभते, असे नामदेव महाराज म्हणतात.
शंकर भगवान संहारक देवता असल्यानेच अकस्मात, अवेळी, अकारण व अकल्पित अशा मृत्यूची छाया आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर अकाली पडू नये अशीच शिवकृपा होण्यासाठीच अनादी कालापासून महाशिवरात्रीच्या उपासना केली जाते. प्रत्येक भक्ताने नित्यनियमाने पहाटे उठून एक तांब्याभर पाणी भगवान शंकराला अर्पण केल्यासही भोलेनाथ आपले संकट दूर करतात, असे मानले जाते. भोळ्या शंकराच्या पिंडीवर त्रिपत्री बेल वाहिल्याने त्या माणसाच्या तीन पिढ्यांचे पाप नाहीसे होण्यास मदत होते, असे शिवलीलामृत सांगते.
महाशिवरात्र ही शिवशंकरांचा कृपाप्रसाद मिळवून देणारा उत्सव आहे. ‘ओम नम: शिवाय’ हा सोपा- सुलभ मंत्र आपल्याला या महाशिवरात्रीच्या उपासनेने उत्तम फल देऊ शकतो. हर हर महादेव, शिव शिव शिव अशा महादेवाच्या विविध मंत्रोच्चारांनी अनेक संकटांचे हरण होत असल्याची मान्यता आहे.
शिव हर शंकर, नमामि शंकर शिव शंकर शंभो । हे गिरिजा पती भवानी शंकर शिव शंकर शंभो ॥ चे उच्चारण करत या महाशिवरात्रीला भगवान शंकराची उपासना करून मनामनातला व कणाकणातला जागवून महादेवाची कृपा मिळवू या.
Shiva Shambho