शिवभोजन केंद्र चालकांचे अनुदान थकले

बिले अदा करण्याची छगन भुजबळ यांची सभागृहात मागणी

नाशिक : प्रतिनिधी

राज्यातील महामंडळाना निधी वाटप करतांना इतर मागासवर्गीय महामंडळावर अन्याय होऊ नये. इतर महामंडळा प्रमाणे समान निधीचे वाटप करण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पॉईट ऑफ इन्फोर्मेशनच्या माध्यमातून सभागृहात केली. यावरील उत्तरात इतर मागासवर्ग विभागावर कुठलाही अन्याय होणार नाही. त्यांना मागणी प्रमाणे आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पॉईट ऑफ इन्फोर्मेशनच्या माध्यमातून सभागृहात प्रश्न उपस्थित करतांना छगन भुजबळ म्हणाले की, राज्यसरकार कडून निधी वाटपात असमानता होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये तारतीसाठी ३०० कोटी, बार्टीसाठी ३५० कोटी, सारथीसाठी ३००कोटी मात्र महाज्योतीसाठी केवळ ५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर इतरमागासवर्ग महामंडळाला ४७.५० कोटी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी ३०० कोटी, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला २०० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. ५४ टक्के लोकसंख्या असलेल्या इतर मागासवर्गाला इतका कमी निधी का असा सवाल उपस्थित करत सर्व महामंडळाना निधी वाटप करतांना समान निधी वाटप करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.

शिवभोजन केंद्राच्या प्रश्नांबाबत ते म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून शिवभोजन या शासनाच्या अतिशय महत्वाकांक्षी योजनेसाठी निधी वितरीत केला जात नाही. त्यामुळे केंद्र चालकांना आपली बिले मिळत नसल्याने केंद्र बंद होण्याच्या मार्गावर आहे. शिवभोजन केंद्रचालक हा गरीब घटक असल्याने त्यांना नियमितपणे आणि वेळेवर निधी वितरीत करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.

समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या प्रश्नावर ते म्हणाले की, समृद्धी महामार्गावर शंभर दिवसांत ९०० अपघात झाले असून यामध्ये ३१ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही बाब अतिशय चिंतेची असून येथील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी त्यांनी केली.

यावरील उत्तरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महामंडळांना मागणी प्रमाणे निधी देण्यात आलेला आहे. काही महामंडळाकडून निधी खर्च न झाल्याने त्यांना मागणीप्रमाणेच निधी तरतूद करण्यात येत आहे. यामुळे ओबीसी बांधवांवर कुठलाही अन्याय होऊ दिला जाणार नाही.मागणी प्रमाणे सर्व प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शिवभोजन योजनेसाठी निधी देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पुन्हा माहिती मागवून निधीची तरतूद करण्यात येईल तसेच समृद्धी महामार्गावर अद्यापही अनेक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून अपघात रोखण्यासाठी निश्चित उपाययोजना करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *