शिवसेनेची वाघीण अशी ओळख असलेल्या
शोभाताई मगर यांचे निधन
नाशिक : वार्ताहर
शिवसेनेची वाघीण म्हणून परिचित असलेल्या आणि अन्यायाविरुद्ध सातत्याने आवाज उठविणाऱ्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शोभाताई मगर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या साठ वर्षांच्या होत्या. त्यांची अंत्ययात्रा हिरावाडीतील रेशीमबंध मंगल कार्यालयात जवळून सायंकाळी 5:30 वाजता निघेल व पंचवटीतील अमरधाम मध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना,नातवंडे असा परिवार आहे
शिवसेनेची एक वाघीण सत्यभामाताई गाडेकर कोरोना काळात सर्वांना सोडून गेल्या. त्या पाठोपाठ आता दुसरी वाघीण शोभाताई मगर यांचेही निधन झाल्याने शिवसैनिकांमध्ये दुःखाची छाया पसरली आहे.
पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात शोभाताई मगर अग्रभागी असायच्या.त्यांनी केलेल्या अनेक आंदोलनाची दखल स्थानिक प्रशासनाला घ्यावी लागली होती. महापालिकेवर शिवसेना प्रणित युतीची दीर्घकाळ सत्ता राहिली.त्यात शोभाताई यांची भूमिका मोलाची राहिली आहे.
शिवसेना अखंड असतांना पक्षाच्या जिल्हाप्रमुख आणि महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून त्यांनी मोलाची भूमिका बजावली. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी आपल्या पदास पुरेपूर न्याय देत महानगरात तसेच जिल्ह्यात शिवसेनेचे आणि विशेषतः महिलांचे व्यापक जाळे विणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने शिवसेनेचे कधीही भरून निघणार नाही इतकी हानी झाली आहे. धीरज आणि मयूर मगर यांच्या त्या मातोश्री होत.