रेबीजचे इंजेक्शन नसल्याने रुग्णांची गैरसोय
वास्तविक पाहता येवला तालुका हा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात दोन आमदार असतानादेखील या तालुक्यातील रुग्णालयामध्ये इंजेक्शनचा तुटवडा असल्याने गोरगरीब गरजू रुग्णांचे मोठे हाल होत असल्याची खंत गरजू लोक करीत आहेत.
नगरसूल ग्रामीण रुग्णालयात कोविड काळात मोठ्या प्रमाणात औषधे उपलब्ध होऊन या रुग्णालयातील कर्मचार्यांनी, डॉक्टरांनी कोविड (कोरोना काळात) रुग्णांना मोठा दिलासा दिला, परंतु त्यानंतर रुग्णालयात कुठल्याही प्रकारची गरीब गरजू रुग्णांना सुविधा उपलब्ध होत नसल्याचे तक्रार रुग्ण करत आहेत.
या रुग्णालयात तीस बेडची उपलब्धता असताना रुग्णालयाच्या बांधकामामुळे आता मात्र इमर्जन्सी काळात फक्त एक बेड उपलब्ध आहे. डिलिव्हरीसाठीदेखील एकच बेड उपलब्ध असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या रुग्णालयात दररोजची ओपीडी 60 ते 100 पर्यंत होत असून, यात मोठ्या प्रमाणात कफ, सर्दी, खोकला यांसारखे रुग्ण जास्त आहेत. टायफाइडसारखे रुग्णदेखील येतात. रुग्णालयात विंचूदंश व सर्पदंशाचे इंजेक्शन उपलब्ध आहे. परंतु रेबीजचे व टीटीचे इंजेक्शन उपलब्ध नाही. ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण मोठ्या शहरांतील कर्मचारी ग्रामीण भागात नगरपालिका भागातून भटकी कुत्रे सोडतात. यावर नगरपालिकांना थांबवणे गरजेचे आहे.