श्री गोदा जन्मोत्सव, महागोदा आरती कार्यक्रम

श्री गोदा जन्मोत्सव, महागोदा आरती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गंगाघाट, रामकुंड परिसरातील वाहतुकीत बदल

सिडको : विशेष प्रतिनिधी
श्री गोदा जन्मोत्सव व महागोदा आरती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गंगाघाट, रामकुंड परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची अधिसूचना नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात आली आहे. ही वाहतूक नियंत्रण व्यवस्था 31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून महागोदा आरती कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहणार आहे.
पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील गंगाघाटावरील दुतोंड्या मारुती परिसरात मोठ्या प्रमाणात भाविक, मान्यवर व व्हीआयपी उपस्थित राहणार असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांची गैरसोय टळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या कालावधीत मालेगाव स्टँड ते रामकुंड, ढिकले वाचनालय ते रामकुंड, खांदवे सभागृहाकडून रामकुंड, सरदार चौक, शनी चौक तसेच नारोशंकर मंदिराच्या मागील बाजूकडील रामकुंडाकडे जाणारे मार्ग सर्वसामान्य वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा व व्हीआयपी वाहने वगळता इतर सर्व वाहनांना या मार्गांवर प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. मालेगाव स्टँड, आडगाव नाका, द्वारका, कन्नमवार पूल, अमरधाम, गौरी पाटांगण व रोकडोबा मैदान मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पार्किंग व्यवस्थेबाबत व्हीआयपींसाठी गंगाघाट भाजीबाजार मैदान, 1111 आरतीसाठी येणार्‍या महिलांसाठी कपुरथळा डोम, तर इतर नागरिकांसाठी गौरी पाटांगण व रोकडोबा मैदान येथे वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त कार्यभार असलेले पोलीस उपआयुक्त (मुख्यालय/वाहतूक) संदीप मिटके यांनी कळविले आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Shri Goda Janmotsav, Mahagoda Aarti Program

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *