नगराध्यक्षपद सर्वसाधारणमुळे चुरस वाढली; पक्षाऐवजी व्यक्तिकेंद्रित राजकारणालाच सिन्नरकरांचे प्राधान्य
मातब्बर नेता ज्या पक्षात असतो तो राजकीय पक्ष सिन्नर तालुक्यात ताकदवर असतो. पक्षाऐवजी व्यक्तिनिष्ठ राजकारणाला तालुक्यात कमालीचे महत्त्व आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे आणि उदय सांगळे या तीन नेत्यांभोवती आता सिन्नरचे राजकारण फेर धरू लागले आहे. त्यामुळे व्यक्तिनिष्ठ राजकारणाचा पगडा असलेल्या सिन्नर नगरपरिषदेत यंदा पहिल्यांदाच दुरंगी
ऐवजी तिरंगी लढत होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. प्रत्येक पक्ष स्वबळाचा नारा देत आहे. मात्र, खासदार वाजे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची मोट बांधल्यात जमा आहे. थेट नगराध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने मोठी चुरस असणार आहे.
सिन्नर नगरपरिषदेच्या निकालाचा परिणाम तालुक्यातील राजकारणावर म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समितीवर होत असतो. त्यामुळे नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्ष सरसावल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये शिवसेना व भाजप यांच्यात नगरपरिषदेच्या 14 प्रभागांत 28 नगरसेवक व थेट नगराध्यक्षपदासाठी दुरंगी लढत झाली होती. त्यावेळी राजाभाऊ वाजे शिवसेनेचे आमदार होते. राजाभाऊ वाजे व उदय सांगळे यांच्या शिवसेनेचे उमेदवार किरण डगळे यांच्यारूपाने सिन्नरकरांना थेट नगराध्यक्ष मिळाला होता. शिवाय 28 पैकी 17 नगरसेवक विजयी झाले होते. एक अपक्ष महिला नगरसेवक विजयी झाल्या होत्या. त्यांनी विजयानंतर लगेचच शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेना नगरसेवकांची संख्या 18 झाली होती. माजी आमदार माणिकराव कोकाटे भाजपमध्ये होते. तेव्हा भाजपचे अवघे दहा नगरसेवक निवडून आले होते.
आता गेल्या नऊ वर्षांत राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. गेल्या निवडणुकीवेळी राजाभाऊ वाजे आमदार होते, तर आता खासदार आहेत. माणिकराव कोकाटे 2016 साली माजी आमदार होते, तर आता राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यावेळी शिवसेना एकसंध होती. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना, अशी दोन शकले झाली आहेत. शिवाय वाजे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून निवडणुकीची रणनीती ठरवणारे उदय सांगळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोकाटे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. राजकीय
समीकरणे बदलण्यासह इच्छुकांची संख्या वाढल्याने सक्षम उमेदवार देताना नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
हे आहेत निवडणुकीत कळीचे मुद्दे
तब्बल 51 चौरस किलोमीटरचा विस्तार असलेल्या नगरपालिकेत मूलभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर वानवा आहे. नव्याने झालेल्या उपनगरांमध्ये रस्ते, पाणी आणि गटारीची समस्या तीव्र आहेत. 24 तास पाणीपुरवठा योजना राबवूनही योजनेच्या वीजपुरवठ्याची समस्या अद्याप सुटलेली नाही. त्यामुळे नागरिकांना कायम खंडित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागतो. याशिवाय मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, उद्यान, नाना-नानी पार्क यांची गरज आहे. मोकाट जनावरे, भटके कुत्रे यांची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याची गरज आहे.

डॉ. संदीप मोरे

हेमंत वाजे

किशोर देशमुख
कृष्णा कासार

प्रमोद चोथवे

राजेंद्र चव्हाणके

विठ्ठलराजे उगले
नगरसेवक दोनने, तर मतदार संख्या 14 हजारांनी वाढली
नोव्हेंबर 2016 साली 14 प्रभागांतून 28 नगरसेवक विजयी झाले होते. यावेळी प्रभागांची संख्या एकने, तर नगरसेवकांची संख्या दोनने वाढली आहे. आता 15 प्रभागांतून 30 नगरसेवक निवडून दिले जाणार आहे. गेल्या निवडणुकीत 40 हजार 517 मतदार होते. यावेळी मतदारसंख्या 54 हजार 387 असल्याने 13 हजार 870 मतदार वाढले आहेत.
भाजपाच्या खेळीने नगराध्यक्ष पदासाठी वाढली चुरस
नगराध्यक्षपद सर्वसाधारणसाठी खुले असल्याने कमालीची स्पर्धा वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती अॅड. राजेंद्र चव्हाणके, माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, कृष्णा कासार इच्छुक आहेत. शिवसेना उबाठा गटाकडून डॉ. संदीप मोरे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे यांची नावे आघाडीवर आहेत. खासदार राजाभाऊ वाजे यांचे चुलते माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे त्यांच्या रूपाने भाजपाला नगराध्यक्षपदाचा तगडा उमेदवार मिळणार आहे. याशिवाय भाजपाकडून स्टाइसचे माजी संचालक किशोर देशमुख इच्छुक आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे.
नगराध्यक्ष निवडीत वाजे, लोंढे घराण्याचे वर्चस्व
स्वातंत्र्यपूर्व काळात 1 ऑगस्ट 1860 साली स्थापन झालेल्या सिन्नर नगरपरिषदेचा 1960 साली शतकपूर्ती, तर 2010 साली 150 व्या वर्षपूर्तीचे दिमाखात आयोजन करण्यात आले होते. नगरपरिषदेत आतापावेतो 37 नगराध्यक्ष निवडून आले. त्यात वाजे घराण्याचा प्रभाव अधिक राहिला. तब्बल पाच वेळा वाजे घरातील व्यक्तीने नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. विठ्ठल बाळाजी वाजे यांनी एकदा, शंकराव बाळाजी वाजे यांनी दोनदा, मथुराबाई शंकरराव वाजे यांनी एकदा, तर हेमंत विठ्ठल वाजे यांनी एकदा, अशी पाच वेळा सिन्नरकरांनी वाजे घराण्याला नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. स्वातंत्र्यानंतर पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मानही वाजे घराण्यातील मथुराबाई शंकराव वाजे यांना मिळाला. याशिवाय माजी नगराध्यक्ष दिवंगत हरिश्चंद्र गणपत लोंढे यांनी दोनदा, तर त्यांची पत्नी भामाताई हरिश्चंद्र लोंढे यांनी एकदा, असे 15 वर्षे नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून कामकाज केले.
आतापर्यंत हे झाले नगराध्यक्ष
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या नगरपरिषदेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून गोविंदराव वामनराव प्रधान यांनी दोनदा, खंडेराव बळवंत देशमुख यांनी दोनदा, कृष्णाजी गोपाळ कुलकर्णी, प्रल्हाद आनंदराव देशमुख, नारायण पंढरीनाथ गुजर यांनी दोनदा, लक्ष्मण नानाजी देशपांडे, रामभाऊ कोंडाजी भगत यांनी काम पाहिले. त्यानंतर गंगाधर भीमाजी येलमामे, विठ्ठल बाळाजी वाजे, जगन्नाथ भिकुसा क्षत्रिय, शंकरराव बाळाजी वाजे यांनी दोनदा, मथुराबाई शंकरराव वाजे, दत्तात्रय नथूजी हांडे, विष्णू लाडूजी वंजारी, रामचंद्र सखाराम सातभाई, मोठेबुवा बाळाजी गोळेसर, नामदेव गंगाधर मुत्रक, गणपत रामभाऊ उबाळे, गंगाधर वामनराव चव्हाणके, इंदूबाई नथुजी हांडे, विमलबाई पन्नालाल कर्नावट, रामनाथ शंकरराव चांडक, हरिश्चंद्र गणपत लोंढे यांनी दोनदा, भामाताई हरिश्चंद्र लोंढे, जगदीश रामनाथ चांडक, सविता रामनाथ लोणारे, सिंधुताई किसन गोजरे, मंगला वसंत शिंदे, विठ्ठल अशोक उगले, अश्विनी हेमंत देशमुख, किरण विश्वनाथ डगळे यांनी नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली.
भाजपाच्या खेळीने नगराध्यक्ष पदासाठी वाढली चुरस
नगराध्यक्षपद सर्वसाधारणसाठी खुले असल्याने कमालीची स्पर्धा वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती अॅड. राजेंद्र चव्हाणके, माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, कृष्णा कासार इच्छुक आहेत. शिवसेना उबाठा गटाकडून डॉ. संदीप मोरे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे यांची नावे आघाडीवर आहेत. खासदार राजाभाऊ वाजे यांचे चुलते माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्या भाजपा प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे त्यांच्या रूपाने भाजपला नगराध्यक्षपदाचा तगडा उमेदवार मिळणार आहे. याशिवाय भाजपाकडून स्टाइसचे माजी संचालक किशोर देशमुख इच्छुक आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत कमालीची चुरस पाहायला मिळणार आहे.
तीन जण झाले जनतेतून नगराध्यक्ष
सिन्नर नगरपालिकेत आतापर्यंत 37 जणांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यात दिवंगत रामनाथ शंकरराव चांडक, त्यांचे पुत्र स्व. जगदीश रामनाथ चांडक आणि गेल्या निवडणुकीत किरण विश्वनाथ डगळे, अशा तीन जणांना सिन्नरकरांनी जनतेला नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली.
भाजप स्वबळाच्या तयारीत; कोकाटेंचे मौन
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक पक्षांच्या घेतलेल्या मेळाव्यात खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. उदय सांगळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळीही स्वबळावर कमळ फुलविण्याचे म्हटले होते. मात्र, शहरात भाजपाची तेवढी ताकद नाही. अजित पवार गटाचे मंत्री व आमदार माणिकराव कोकाटे गेल्या आठवड्यात सिन्नरला झालेल्या पक्षाच्या मेळाव्याला हजर नव्हते. त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नसली, तरी स्वबळावर निवडणूक लढवून नगरपालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी त्यांची रणनीती सुरू आहे.