शताब्दीच्या उंबरठ्यावर वाटचाल; पायाभूत सुविधांकडे हवे लक्ष
भगूर नगरपरिषदेची सन 1925 मध्ये स्थापना झाली. गेल्या शंभर वर्षांत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे राबवली आहेत. एकूण 10 प्रभाग आणि 20 नगरसेवकांच्या प्रतिनिधित्वाखाली आजवर 38 नगराध्यक्ष भगूर शहराने पाहिले आहेत. जयवंतराव देशमुख, पां. भा. करंजकर, चिमणराव देशमुख, एकनाथ शेट्येेे, मदन लाहोटी, अकबर वकील, सौ. राहणे, सुमन बेलदार, सीताबाई जाधव, भारती साळवे, गोरख बलकवडे, विजय करंजकर, स्वाती झुटे, अनिता करंजकर यांसारख्या दिग्गजांनी नगराध्यक्षपद भूषवले आहे. स्थापनेच्या शताब्दी वर्षाआधी भगूरमध्ये मोठे प्रकल्प अपेक्षित आहेत. बदललेली राजकीय समीकरणे आणि आरक्षणाची नवी रचना या सर्वांची एकत्रित परिणती म्हणून यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. आगामी निवडणुकीत भगूरची दिशा ठरवणारे निकाल लागतील अशी अपेक्षा आहे.
नवीन जलयोजना
शहरासाठी 24.38 कोटींची नवीन जलयोजना मंजूर करण्यात आली असून, जुन्या योजनेमुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत असल्याने नवीन जलयोजना मंजूर करण्यात आली. दारणा धरणाला उद्भव मानून तीन जलशुद्धीकरण केंद्रांंची कामे सुरू आहेत. 135 लिटर प्रतिव्यक्ती पाणीपुरवठा आवश्यक आहे. सन 2056 पर्यंतच्या लोकसंख्येसाठी पुरेसा पाणीसाठा नियोजित केला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, कामे सुरू आहेत.
विकासकामे
भगूरमध्ये 24.64 कोटींची योजना अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांंतर्गत 24.64 कोटी खर्चाची भुयारी गटार योजना प्रस्तावित असून, तांत्रिक मान्यता मिळाली आहे. आधुनिक मलनिस्सारण व्यवस्था व वैज्ञानिक प्रक्रिया, स्वच्छता सुविधांचा विस्तार, पर्यावरणपूरक शहरी विकास सुरू आहे. स्वच्छ भारत अभियानात सन 2018 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी भगूर नगरपरिषदेला पाच कोटींचे पारितोषिक मिळाले. यानंतर शहरात कचरा व्यवस्थापन बळकट करणे, तसेच वैज्ञानिक वर्गीकरण, स्वच्छता अभियान, आधुनिक संकलन साधने यांचा वापर, नियमित सफाई मोहिमा यामुळे भगूर शहर स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श ठरत आहे.
मावळत्या परिषदेचे बलाबल
शिवसेना- 16
काँग्रेस- 01
नगराध्यक्ष- शिवसेना
आरक्षण रचनेनुसार जागा
सर्वसाधारण : 08
ओबीसी : 05
ओबीसी महिला : 03
एसटी पुरुष : 01
एससी महिला : 02
एससी पुरुष : 01
भगूर शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानाचे काम अद्याप अपूर्ण आहे. प्रशासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, स्वा. सावरकरांचे
निवासस्थान हे ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. त्याच्या जवळच मद्यविक्री केंद्र सुरू असल्याने पर्यटकांवर नकारात्मक छाप पडते. त्या परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण आहे.
– जयश्री देशमुख, माजी सभापती, भगूर
दलित वस्तीमध्ये उभारण्यात आलेल्या शौचालयांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या परिसरातच तयार केलेले ग्रीन जिम अजूनही बंद असून, ते तरुणांंसाठी खुले करण्यात आलेले नाही.
– केतन सोनवणे, स्थानिक नागरिक, भगूर
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजी विक्रेते अतिक्रमण करून बसतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. भगूर गावात पार्किंगला अजिबात शिस्त नसून, पार्किंग व वाहतुकीवर लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
– नीलेश गायकवाड, स्थानिक व्यावसायिक, भगूर