सुवर्ण रेशीम गटाकडून दहा एकरांत रेशीम शेती

आशाकिरणवाडीत नावीन्यपूर्ण प्रयोग; रोहयोचा शेतकर्‍यांना लाभ

अस्वली स्टेशन ः प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी येथील सुवर्ण रेशीम शेतकरी गटाच्या दहा शेतकर्‍यांनी एकत्र येत रेशीम शेतीचा नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. शासनाच्या रोजगार हमी अनुदान योजनेचा दहा शेतकर्‍यांनी लाभ घेऊन एकरी पाच हजार 500 तुतीची झाडे लावून दहा एकरावर तुतीलागवड केली.
जिल्हा रेशीम अधिकारी पी. व्ही. इंगळे, कृष्णनगरचे रेशीम शेतकरी नानासाहेब जाधव यांचे मार्गदर्शन मिळत आहे. पिकवलेला रेशीम तुतीचा पाला हा अळ्यांचे खाद्य असून, यासाठी शेतीत 22 बाय दहाचे एकूण दहा शेड उभ्या केल्या आहेत. साधारण तीस दिवसांत अळ्या तयार होतात.
गटातील दहा सदस्यांचा रेशीम बीड जिल्ह्यात विक्रीसाठी जात आहे. गटाचे अध्यक्ष सोमनाथ जोशी, उपाध्यक्ष लीलाबाई काशीनाथ जोशी, सचिव चहादू कारोटे, मंगळू बेंडकोळी, शिवाजी जोशी, प्रकाश जोशी, अशोक भारते, शिवराम चिरके, लुखा जाधव, नामदेव खोकले आदी दहा सदस्यांनी सुरू केलेल्या रेशीम शेतीला त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची मदत होते. विशेष म्हणजे या शेतीत कीटकनाशके फवारण्याची गरज भासत नाही. तुती लागवडीसाठी जीवामृत, शेणखत, गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादन मिळाले.
इगतपुरी तालुक्यात काही वर्षांपूर्वी रेशीम शेतीचा एक गुंठाभरही प्रयोग नव्हता, तो आता 40 एकरावर जाऊन पोहोचला आहे. या प्रयोगातून दुप्पट उत्पन्नाची आशा व्यक्त करण्यात आली.

15 ऑक्टोबर 2005 रोजी आमच्या ‘वैतागवाडीला‘ राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भेट दिली होती. आशेचा किरण दाखवणारे डॉ. कलाम यांनी आधुनिक शेती करण्याचा संदेश या वाडीला दिला होता. त्यांच्या कानमंत्राची प्रेरणा घेऊन रेशीम शेती करीत आहे. या शेतीत वर्षातून पाच-सहा वेळा पीक घेऊ शकतो. सध्या मार्केट जरी दूर असले, तरी भविष्यात इगतपुरी तालुक्यात मार्केट तयार करण्याचा मानस आहे.
– सोमनाथ जोशी, अध्यक्ष, सुवर्ण रेशीम शेतकरी बचतगट

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *