केवळ बैठकांच्या फार्समुळे साधूंची निराशा; उज्जैनला तयारी पूर्ण
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण अवघ्या नऊ महिन्यांवर येऊन ठेपले आहे. नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे सुरू झालेले काम वगळता एकही काम अद्याप मार्गी लागलेले नाही. केवळ कागदोपत्री आराखडे तयार करणे आणि बैठकांचा फार्स करणे यामध्ये शासन यंत्रणा व्यस्त झाली आहे. विकासकामांबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला दिसत नाही. आखाड्यांना द्यावयाच्या मूलभूत सुविधांच्या कामांबाबत शासन गंभीर नसल्याने अद्यापपर्यंत निविदा सूचनादेखील निघालेल्या नाहीत. कागदोपत्री पूर्तता करताना किमान दोन-अडीच महिने निघून जातील आणि प्रत्यक्ष कामासाठी अवघे दोन महिने शिल्लक राहतील. त्यामुळे विकासकामांच्या पूर्ततेचा वेग आणि गुणवत्ता दर्जा यांचा मेळ घालणे अशक्य होईल, याबाबत साधू -महंतांनी खंत व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, मध्य प्रदेशातील उज्जैन येथे दोन वर्षांनी कुंभमेळा आहे. मात्र, तेथील विकासकामे पूर्ण झाली आहेत. तसेच आणखी पाच वर्षांनी हरिद्वार येथे कुंभमेळा होईल, तेथील कामांना लवकरच प्रारंभ होत आहे. त्र्यंबकेश्वर येथील साधू आखाड्यांचे पंच महंत यांनी उज्जैन आणि हरिद्वार येथील कुंभमेळ्याबाबत लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्र सरकारने आपली निराशा केल्याचे स्पष्ट मत साधू व्यक्त करत आहेत. बैठका आणि चर्चा यामध्ये वेळ गेला असल्याचे आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत स्वारस्य नसल्याचे मत बहुतांश साधू-महंतांनी व्यक्त केले आहे.
21 फेब्रुवारी 2015 रोजी त्र्यंबकेश्वर येथील रेणुका हॉल या ठिकाणी सिंहस्थ 2015 नियोजनाची संयुक्त बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. त्यावेळी त्यांनी पुढील सिंहस्थात असा उशीर होणार नाही. कुंभमेळा ध्वजा उतरवली जाईल व त्याच वेळेस पुढचा म्हणजेच 2026-27 कुंभमेळ्याच्या तयारीला प्रारंभ करणार असल्याचे जाहीर केले
होते.
या घटनेला आता 11 वर्षे पूर्ण होत आले. मात्र, प्रत्यक्षात कामांना अद्याप मुहूर्त लागलेला नाही. आराखडे तयार करणे आणि ते रद्द करणे व पुन्हा नव्याने आराखडा तयार करणे हे चक्क दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यांचे सादरीकरण आणि त्यावर चर्चा हा आता फार्स ठरला आहे. अशा प्रकारचा वेळकाढूपणा साधू-महंतांचा अपमान करणारा ठरतो आहे. यामध्ये उज्जैन आणि हरिद्वार कुंभमेळ्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी काही आखाड्यांचे साधू-महंत त्र्यंबकेश्वरला फिरकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने निराशा केली असल्याचे आणि आखाड्याचे साधू-महंत त्यांच्या क्षमतेवर कुंभमेळा करतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. कुंभमेळा प्राधिकरण केल्याने कोणताही सकारात्मक परिणाम झालेला दिसून आलेला नाही. यामध्ये केवळ अधिकार्यांची वर्णी लावण्यासाठी खटाटोप असल्याचे काही साधू-महंतांचे मत आहे.
आखाड्यांच्या अंतर्गत होत असलेल्या कामांबाबत शासनाकडून होत असलेली दिरंगाई गंभीर आहे. आखाड्यांमध्ये सेवासुविधांची कामे वेळेत झाली नाही तर कुंभमेळा पर्वात सहभागी होण्यासाठी आलेले साधू आणि भक्त यांची गैरसोय होणार आहे. यासाठी आखाडे स्वत:च्या सुविधा स्वत: निर्माण करतील, मात्र शासनाने वेळेत त्यांना याबाबत पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, सरकारच्या अशा प्रकारच्या नकारात्मक कृतीने येथे येणारे साधू आणि भक्तांची संख्या कमी होईल, असे दिसते.
शासन वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापुढील कालावधीत उज्जैन आणि हरिद्वार येथे होत असलेल्या कुंभमेळ्याची तयारी करण्यासाठी साधूंना वेळ द्यावा लागणार आहे. त्र्यंबकेश्वर, नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नियोजनात केवळ बैठकांचा फार्स होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-महंत शंकरानंद सरस्वती महाराज,
कोशाध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद
Simhastha flag hoisting ceremony 9 months away; What about the work?