नाशिक

चांदवड न.प.वर एकहाती सत्ता मिळवत भाजपाने बालेकिल्ला केला भक्कम

नगराध्यक्षपदाच्या चुरशी निवडणुकीत भाजपाचे वैभव बागूल विजयी

चांदवड : वार्ताहर
चांदवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून, शहराच्या राजकीय क्षितिजावर भाजपाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भाजपाने नगरपरिषदेवर आपली एकहाती सत्ता मिळवत आपला बालेकिल्ला अधिक भक्कम केला आहे
नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या आणि हाय-व्होल्टेज ठरलेल्या लढतीत भाजपाचे वैभव विजय बागूल यांनी 6,925 मतांसह विरोधकांचा सुफडा साफ करत ऐतिहासिक विजय संपादन केला. त्यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार राजेश रमेश अहिरे (राजाभाऊ) यांचा पराभव केला, ज्यांना 4,622 मते मिळाली. भाजपाने नगराध्यक्षपदासह प्रभागातील 20 पैकी 11 जागांवर विजयाची मोहोर उमटवून निर्विवाद सत्ता काबीज केली असली, तरी या सत्तेच्या लाटेतही 5 प्रभागांतील मतदारांनी अपक्ष उमेदवारांना पसंती देत प्रस्थापित पक्षांना जोरदार करंट दिला आहे.
निकालाचे चित्र स्पष्ट होताच भाजपाचा बालेकिल्ला अधिक भक्कम झाल्याचे दिसून आले. प्रभागातील लढतीत भाजपाच्या वतीने प्रियांका राऊत (601 मते), मनीषा भालेराव (681 मते), भूषण कासलीवाल (879 मते), जीवन देशमुख (912 मते), कमल जाधव (793 मते), राहुल कोतवाल (874 मते), अनिता बडोदे (732 मते), महेंद्र गांधीमुथा (537 मते), सरला अग्रवाल (822 मते), संभाजी गुंजाळ (780 मते) आणि लिलाबाई कोतवाल (695 मते) यांनी विजयाचा गुलाल उधळला. विशेष म्हणजे, प्रभाग 9 अ मध्ये सर्वांत थरारक लढत पाहायला मिळाली, जिथे अपक्ष प्रदीप बनकर यांनी 610 मते मिळवून भाजपाच्या प्रवीण साळवे (600 मते) यांचा अवघ्या 10 मतांनी पराभव करत जायंट किलर ठरले.

विजयाचा जल्लोष

निकालाचे चित्र स्पष्ट होताच निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष वैभव बागूल आणि सर्व विजयी उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. प्रमाणपत्र हाती पडताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भाजपा समर्थकांनी “विजय असो“च्या घोषणा देत संपूर्ण शहर गुलालात न्हाऊन काढले. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने आणि फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीने चांदवडमध्ये जणू दिवाळी साजरी होत असल्याचे उत्साही चित्र पाहायला मिळाले.

अपक्षांची मुसंडी, प्रस्थापितांना धक्का :
अपक्षांनी या निवडणुकीत घेतलेली मुसंडी राजकीय विश्लेषकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. प्रभाग 2 मधील दोन्ही जागांवर अपक्षांनी विजय मिळवला असून, मंगल मोरे (781 मते) आणि राजू बागवान (720 मते) यांनी बाजी मारली. तसेच प्रभाग 3 मधूनही अपक्ष प्रसाद सोनवणे (635 मते) आणि नयना वाघ (453 मते) विजयी झाले. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे) पक्षाने प्रभाग 4 मधून पल्लवी मोरे (779 मते) आणि संदीप उगले (906 मते) अशा 2 जागा जिंकून महायुतीची ताकद दाखवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सुधीर कबाडे (551 मते) आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या राजश्री प्रसाद प्रजापत (493 मते) यांनी प्रत्येकी एक जागा जिंकून आपापल्या पक्षाचे अस्तित्व राखले.

कोतवाल यांचे राजकीय कौशल्य :
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिरीषकुमार कोतवाल यांचा पराभव झाला होता. कोतवालांना ही निवडणूक अवघड जाईल, त्यांचा पराभव होईल, परंतु त्यांचे राजकीय कौशल्य आणि खेळी याचा प्रत्यय या निवडणुकीत बघायला मिळाला. उमेदवार त्यांचा मुलगा असला तरी प्रतिष्ठा त्यांची होती. त्यामुळे त्यांनी मुलासह संपूर्ण भाजपाच्या उमेदवारांना घवघवीत मिळवून दिले. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे शंभुराजे खैरे (833 मते) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे विकी जाधव (816 मते) यांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. विशेष म्हणजे, 116 मतदारांनी कोणालाही पसंती न देता नोटाचा वापर केला.

शिंदे गटाचे उगले यांचा गड कायम :
शिवसेना शिंदे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या गाडगेबाबा चौक येथील उमेदवार संदीप तात्या उगले यांनी आपला गट कायम ठेवला. विकासाच्या जोरावर त्यांनी यश मिळवले. चांदवडमधून अवघ्या युतीमध्ये चारच जागा शिंदे गटात मिळाल्या होत्या. त्यापैकी प्रभाग क्रमांक चारमध्ये संदीप उगले व पल्लवी मोरे या विजयी झाल्या. त्यांचे प्रभागावरील वर्चस्व त्यांनी तेथे कायम ठेवले. प्रभाग क्रमांक 6मध्ये अपक्ष उमेदवार राजू शेलार यांचा हा बालेकिल्ला समजला जात होता. परंतु वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले डॉ. जीवन देशमुख तसेच आपल्या आईची राजकारणावर असलेली पकड यांनी हा गड भेदून आपला विजय निश्चित केला.

आमदार डॉ. आहेर यांच्या नेतृत्वाखाली कमळ फुलले
मंत्री गिरीश महाजन व डॉ. राहुल आहेर यांच्या प्रयत्नाने चांदवड नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. नगरपरिषदेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची बघायला मिळाली. यामध्ये बरेचसे उमेदवार भाजपाने तिकीट नाकारलेले उमेदवार होते. मंत्री गिरीश महाजन यांनी चांदवडमध्ये येऊन बर्‍याचशा उमेदवारांची माघार घेतली होती. परंतु, काही उमेदवारांनी उमेदवारी केली. त्याचा भाजपाला फटका बसेल का, असे वाटत होते. परंतु, मंत्री गिरीश महाजन यांचे राजकीय कौशल्य तसेच डॉ. राहुल आहेर यांचे पक्षीय संघटन यामुळे हा विजय
निश्चित झाला.

Single-handedly gaining power over Chandwad NP

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

8 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

9 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

9 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

9 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

9 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

9 hours ago