भुवई, कानाच्या पाठीमागेही गंभीर जखम
सिन्नर : प्रतिनिधी
दुचाकीस्वाराच्या गळ्यात मांजा अडकून त्याच्या उजव्या डोळ्याच्या भुवईजवळ आणि कानाच्या पाठीमागच्या बाजूला गंभीर जखम झाल्याची घटना शनिवारी (दि.29) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास संगमनेर नाक्यावर घडली. या घटनेत वैभव आणेश काळे (वय 29, रा. कानडी मळा, सिन्नर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला 80 टाके घालण्यात आले. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, केवळ दैव बलवत्तर म्हणून या तरुणाचा जीव वाचला असून, या घटनेने पुन्हा एकदा सिन्नर शहरातील नायलॉन मांजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वैभव आणेश काळे (वय 29) हा युवक कानडी मळ्यातील आपल्या घरातून झाल्यानंतर दुचाकी घेऊन सिन्नर बसस्थानकाकडे येत होता. संगमनेर नाक्याजवळ त्याच्या गळ्याभोवती पतंगाचा नायलॉन मांजा अडकला. नायलॉन मांजाने त्याच्या गळ्याला, उजव्या डोळ्यावर भुवई आणि कानाच्या पाठीमागील बाजूला गंभीर स्वरूपात कापले गेले.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. स्थानिकांनी वैभव यास तातडीने सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉ. महेश खैरनार आणि शकील शेख यांनी त्याच्यावर उपचार केले. वैभव काळे यांना सुमारे 75 ते 80 टाके पडले आहेत. पतंगाच्या नायलॉन मांजामुळे गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून, सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. महेश खैरनार
यांनी दिली.