सिन्नर नागरीच्या थकबाकीदारांच्या मालमत्तेचा होणार लिलाव

पतसंस्थेतील ठेवीदारांना पैसे मिळण्याची आशा

सिन्नर : प्रतिनिधी
थकबाकीदारांचे पैसे वसूल करण्यासाठी सर्व मार्गांचा अवलंब करून, कायदेशीर बाबी व पोलीस यंत्रणांच्या सहाय्याने थकबाकीदारांच्या तारण व इतर मालमत्तांचा लवकरच लिलाव करण्यात येईल. या कामासाठी अंतिम प्रस्ताव तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे आश्वासन सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी ठेवीदारांना दिले.
नुकतीच सिन्नर नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांची व सहाय्यक निबंधक संजय गिते यांच्यासमवेत बैठक पार पडली. निबंधकांच्या कठोर भूमिकेमुळे अनेक वर्षांपासून अवसायनात निघालेल्या सिन्नर नागरी पतसंस्थेत व निबंधक कार्यालयात ठेवी परत मिळण्यासाठी चकरा मारून हवालदिल झालेल्या गुंतवणूकदारांना कष्टाचे पैसे परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. संस्थेची थकीत कर्जांची वसुली वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून, लिलावाचे वेळी ठेवीदारांनी लिलावात भाग घ्यावा, असेही आवाहन वसुली अधिकारी शेंडे यांनी केले.
त्याचप्रमाणे संस्थेच्या मालकीच्या मालमत्तांचाही लिलाव करावा, अशी मागणी उपस्थित ठेवीदारांनी यावेळी केली. परंतु, संस्थेच्या मालमत्ता न्यायालयीन प्रक्रियेत असल्यामुळे न्यायालयाच्या परवानगीशिवाय मालमत्तांचा लिलाव करता येणार नाही, असे यावेळी अधिकार्‍यांनी सांगितले. यावेळी संतप्त ठेवीदारांनी आमची रास्त मागणी लेखी स्वरूपात न्यायालयाला व संबंधित अधिकार्‍यांना पाठवा अशी मागणी केली. जे ठेवीदार मृत झालेले आहेत त्यांच्या वारसांनी आपले वारस नोंद करून घेण्याचे आवाहन यावेळी केले. तत्पूर्वी सहाय्यक निबंधक यांच्यासह सर्व ठेवीदार, संबंधित अधिकारी यांनी ठेवीदारांचे गार्‍हाणे मांडण्यासाठी सोमवार दि. 28 एप्रिल 25 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा निबंधक कार्यालय नाशिक येथे हजर राहण्याचे ठरविण्यात आले. बैठकीत सर्वश्री शेळके, भुसे, डॉ. जी. एल. पवार, नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सेवा निवृत्त अधिकारी राजेंद्र घोगे, भाऊसाहेब सांगळे, दिवाकर पवार, कृष्णा पवार आदींनी चर्चेत भाग घेतला. यावेळी सभासद दशरथ लोंढे, तानाजी जाधव, सोमनाथ तांबे, सुरेश आव्हाड, श्रीकांत गुजराथी, संध्या बिडवे, मालन इंदूरकर, रोशन पवार, निवृत्ती डावरे, बाळासाहेब घोलप, सुबोध वाईकर, विनोद वाईकर, दत्तात्रय डोंगरे, शांता लोंढे आदी उपस्थित होते.

20 जूनला घेणार पुन्हा आढावा

थकबाकीदारांच्या मालमत्तांची लिलाव प्रक्रीया सुरु झाल्यानंतर त्याची वृत्तपत्र व इतर माध्यमातून करण्यात येणारी जाहिरात पतसंस्थेच्या सर्व सभासदांना व संबंधित अधिकार्‍यांना सहाय्यक निबंधक व जिल्हा निबंधक कार्यालयाकडून करण्यांत येईल असे आश्वासन सहाय्यक निबंधक संजय गीते, वसुली अधिकारी शेंडे यांनी उपस्थित ठेवीदारांना दिले. याबाबत दि. 19 जुन 2025 पर्यत झालेल्या व उर्वरित कार्यवाहीचा अहवाल व अंतीम निर्णय घेण्यासाठी दि. 20 जुन 2025 रोजी पुन्हा ठेवीदार व संबंधित अधिकार्‍यांसमवेत बैठक घेण्यात येईल असे गीते यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *