बहुतेक ठिकाणी 5 ते 10 तास बत्ती गुल, ‘महावितरण’चे 42 लाखांचे नुकसान
सिन्नर ः प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून सिन्नर शहर आणि तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वार्याने धुमाकूळ घातल्याने बहुतेक ठिकाणी 33 आणि 12 केव्ही उच्चदाब आणि लघुदाब वाहिनीचे पोल उन्मळून पडल्याने शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या भागात सुमारे 8 ते 10 तास बत्ती गुल होती. महावितरणचे वादळी वार्यामुळे सुमारे 42 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कडक उन्हाळा असला तरी सुमारे 18 ते 20 किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने तापमानात 3 ते 4 डिग्रीची घट झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना सोसाट्याच्या वार्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.
महावितरणच्या सिन्नर 2 उपविभागात लघुदाब वाहिनीचे 30, 11 केव्हीचे 15 पोल उन्मळून पडले. तर 5 रोहित्र खराब झाले. सिन्नर शहरातून मातोश्री हॉस्पिटल जवळून जाणार्या 33 केव्ही लाईनवर दोन वृक्ष उन्मळून पडल्याने तेथील दोन पोल जमीनदोस्त झाले. परिणामी, दापूर उपकेंद्र आणि नांदूरशिंगोटे उपकेंद्रात सुमारे सात ते दहा तास वीजपुरवठा खंडित होता. उपकार्यकारी अभियंता विठ्ठल हारक यांच्यासह त्या – त्या उपकेंद्रातील अधिकार्यांनी तातडीने कार्यवाही करत उन्मळून पडलेले पोल पुन्हा उभे करत वीजपुरवठा सुरळीत केला. सिन्नर -1 विभागात लघुदाब वाहिनीचे 35 आणि उच्चदाब वाहिनीचे 12 पोल उन्मळून पडले. सोनांबे, आटकवडे, कुंदेवाडी, बेलू, माळेगाव, डुबेरे, ठाणगाव, मुसळगाव, माळेगाव एमआयडीसीतील काही भाग यामुळे प्रभावित झाला होता. त्या – त्या भागातील उच्च आणि लघुदाब वाहिनीचे पोल पुन्हा उभे करून येथील वीजपुरवठा पूर्ववत केल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता हेमंत बनसोडे यांनी दिली.
फळे, भाजीपाल्याचे 21 हेक्टर क्षेत्र बाधित
सोनांबे परिसरात सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार गारपीट झाली. या गारपिटीत 18 शेतकर्यांचे 5 हेक्टरवरील भाजीपाला पीक उद्ध्वस्त झाले. कोनांबे परिसरातील 15 शेतकर्यांचे पाच हेक्टरवरील टोमॅटोचे नुकसान झाले. तर वडगाव सिन्नर येथे 9 शेतकर्यांचा 3 हेक्टर शेतात पडलेला कांदा भिजला. हरसुले येथे 12 शेतकर्यांचा 5 हेक्टरवर कांदा भिजून नुकसान झाले. नायगाव येथे 3 शेतकर्यांचे 2 हेक्टर तर वडझिरे येथे 1 शेतकर्याचे एक हेक्टर असे तीन हेक्टर आंब्याच्या बागेचे वादळी वार्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्राथमिक स्वरूपात ही नुकसानीची आकडेवारी प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार सुरेंद्र देशमुख, नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी दिली.
दोन ठिकाणी घरांची पडझड
जायगाव येथील राजेंद्र पुंडलिक गायकवाड यांच्या विटा – सिमेंटच्या राहत्या घरावर झाड पडून नुकसान झाले. त्यामुळे पत्रेही उडून गेले. याशिवाय, पास्ते येथील रमेश धोंडीराम माळी यांच्याही राहत्या घरावर झाड पडून पत्रे फुटल्यामुळे नुकसान झाले. दोन्हीही ठिकाणी कुठल्याही प्रकारे जीवितहानी झाली नाही.