सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर – शिर्डी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण गंभीर तर 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत. बुधवारी (दि.9) दुपारी 1.20 वाजेच्या सुमारास दातली फाट्यावर हा अपघात घडला.
अपघातात दुचाकीवरील संजय यादवराव डांगे (26) रा. पोहेगाव, ता. कोपरगाव हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी नाशिक येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसर्या दुचाकीवरील सिंधू किशोर बर्डे (50) आणि सुदाम रामजी बर्डे (35) दोघे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर सिन्नरच्या खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. धनगरवाडी येथील सुदाम रामजी बर्डे आणि सिंधु किशोर बर्डे हे (एमएच -17, सीए – 8534) या दुचाकीवरून सिन्नर – शिर्डी मार्गाने वावीच्या दिशेने जात होते. याचवेळी डांगे हे शिर्डीकडून सिन्नरच्या दिशेने (एमएच -17, सीके – 6631) या दुचाकीवरून येत होते. दातली फाट्यावरील कट पॉईंट जवळ दोन्ही वाहनांना एकमेकांचा अंदाज न आल्याने समोरासमोर भीषण अपघात झाला. दरम्यान, महामार्ग पोलीस केंद्राचे सोमठाणे येथील कर्मचारी विलास साळुंखे हे दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांनी हा अपघात पाहिल्यावर घटनास्थळी थांबून मदतकार्य केले. लागलीच रुग्णवाहिका बोलावून जखमींना उपचारासाठी सिन्नरला दाखल केले. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.