साहेब, आम्हाला इच्छामरण द्या!

प्रांताधिकारी कार्यालयात कांदा ओतून संतप्त शेतकर्‍यांची आर्त हाक

चांदवड वार्ताहर
कांद्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याने संतप्त झालेल्या चांदवडमधील शेतकर्‍यांनी प्रहार शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 10) प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले. यावेळी काही आंदोलकांनी सोबत आणलेले कांदे थेट प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या केबिनमध्ये ओतले अन् साहेब, आम्हाला इच्छामरण द्या, अशी आर्त हाक दिली.
सध्या कांद्याला 8 ते 10 रुपये प्रतिकिलो इतका मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर भरून आणलेले कांदे प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात ओतून आपला रोष व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनी नाफेड आणि एनसीसीएफया संस्थांच्या चुकीच्या खरेदी धोरणांवर जोरदार टीका केली.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या- शासनाने शेतकर्‍यांचा कांदा 24 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावा, कांद्याला नियमनमुक्त करून कायमस्वरूपी कांदा धोरण ठरवावे. नाफेड आणि एनसीसीएफ या कांदा खरेदी संस्था बंद कराव्यात किंवा त्यांच्या खरेदीमध्ये पारदर्शकता आणावी. या संस्थांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. ज्या शेतकर्‍यांनी 24 रुपये प्रतिकिलो दरापेक्षा कमी भावाने कांदा विकला आहे, त्यांना 1500 रुपये प्रतिक्विंटल अनुदान द्यावे. सरकारने खरेदी केलेला कांद्याचा बफर स्टॉक खुल्या बाजारात न विकता तो स्वस्त धान्य दुकानांतून विकावा आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी शेतकर्‍यांना न्याय मिळालाच पाहिजे, कांद्याला भाव मिळालाच पाहिजे आणि कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणांनी प्रांताधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनामुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनात प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *