सहा हजार मिळकती मालमता कराच्या कक्षेत !

मनपाच्या तिजोरीत पडणार साडेबारा कोटींची भर, नोंद नसलेल्या मालमत्तांचा शहरात शोध

नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या करसंकलन विभागाने उत्पन्न वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत करसंकलन विभागाने 5 हजार 969 नव्याने मिळकती शोधून त्या मालमत्ता कराच्या कक्षात आणल्या आहेत. दरम्यान, संबंधित मिळकतदारांकडून वर्षाला 12 कोटी 60 लाखांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत पडणार आहे.

मागील काही वर्षांपासून महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून, विकासकामांना मर्यादा पडत आहे. शिवाय, पंधराव्या वित्त आयोगाने उत्पन्नाचे स्रोत वाढवा, अन्यथा विकास योजनांसाठी निधी दिला जाणार नाही, अशी तंबी दिली होती. शहराचा विकास झपाट्याने होत असताना नव्या मिळकतींची त्यात भर पडत आहे. करसंकलन विभागाने अशा नवीन मालमत्ता आकडेवारीची नगररचना विभागाकडून माहिती घेत या मालमत्तांना कर कक्षेत आणल्या जात आहेत. अद्याप पंचवीस हजार मालमत्तांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महापालिकेने पाणीपट्टी बिलाच्या वाटपाचे काम खासगी संस्थेला दिले आहे.
आतापर्यंत चाळीस हजार नळ कनेक्शन तपासले आहेत. दरम्यान सध्याच्या घडीला नगररचना विभागाकडून आकारले जाणारे बांधकाम परवाने शुल्क, करसंकलन विभागाकडून होणारी घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली व केंद्राकडून जीएसटीपोटी मिळणारा परतावा या उत्पन्नावरच मनपाचा आर्थिक डोलारा उभा आहे. त्यामुळे आयुक्तांच्या सूचनेनुसार विविध विभागांनी उत्पन्नाचे नवे स्रोत शोधण्यावर भर दिला आहे. त्यात करसंकलन विभाग गेल्या वर्षापासून आघाडीवर आहे.

गतवर्षी 31 हजार मिळकती शोधण्यात यश

दरम्यान, गेल्या वर्षी करसंकलन विभागाने नव्या मिळकती शोधण्याची मोहीम हाती घेतली असता, तब्बल 31 हजार नव्या मिळकती शोधून त्या कराच्या कक्षेत आणल्या होत्या. त्यातून तब्बल 55 कोटींचा महसूल पालिकेला मिळाला होता. यंदाही नव्या मालमत्तांचा शोध घेतला जातो आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *