घोटेवाडीत सहा ट्रॉली कडब्यासह 55 टन मुरघास आगीत भस्मसात

दोन लाखांचे नुकसान; ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या तोंडचा घास हिरावला
सिन्नर : प्रतिनिधी

तालुक्यातील घोटेवाडी येथील शेतकरी विलास गंगाधर घोटेकर यांचा घराशेजारील खळ्यावर असलेला कडबा व मुरघास आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.14) दुपारी 1.30 ते 1.45 वाजेच्या सुमारास घडली.

घोटेवाडी येथे विलास गंगाधर घोटेकर हे कुटुंबीयांसह वास्तव्यास असून, शेतीसह दुग्धव्यवसाय करतात. दुग्ध व्यवसायासाठी पाळलेल्या जनावरांसाठी घोटेकर यांनी घराशेजारी खळ्यावर 50 ते 55 टन मुरघास बॅगा भरून ठेवलेला होता तसेचसहा ट्रॉली ज्वारीचा कडबा रचून ठेवला होता. सोमवारी घोटेकर कुटुंबीय विवाहासाठी बाहेर गेले होते तर घरात लहान मुलेच होती. दुपारी 1.30 ते 1.45 वाजेच्या सुमारास घराशेजारील खळ्यातील चार्‍याला आग लागल्याचे पाहताच मुलांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या शेतकर्‍यांना बोलावले.
शेजारी शेतात वस्ती करून राहणार्‍या पूनम जितेंद्र घोटेकर, आप्पासाहेब घोटेकर, दादाभाऊ घोटेकर यांच्यासह परिसरातील शेतकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. विलास घोटेकर यांचा पुतण्या गणेश घोटेकर याने त्यांचे ट्रॅक्टर-टँकरच्या तीन ते चार खेपा करून आग आटोक्यात आणली. या आगीत घोटेकर यांनी जनावरांसाठी साठविलेला सहा ट्रॉली ज्वारीचा कडबा व बॅगा भरून ठेवलेला 50 ते 55 टन मुरघास भस्मसात झाल्याने घोटेकर यांना सुमारे पावणेदोन ते दोन लाखांचा आर्थिक फटका बसला आहे. ऐन उन्हाळ्यात जनावरांसाठी साठविलेला चारा आगीत खाक झाल्याने जनावरांच्या तोंडचा घास हिरावला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *