सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी भाषेचा व महाराष्ट्राच्या गौरवशाली देदीप्यमान इतिहासासोबतच मराठीजनांंनी नेमकं काय केलं पाहिजे, याचा केलेला हा ऊहापोह…
गेल्या 3 ऑक्टोबर 2024 रोजी अखेर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. नवरात्रीच्या पहिल्या माळेचा मान आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून मिळाला. किती दुग्धशर्करा योग होता हा! भाषा बोलणार्यांच्या प्रमाणाचा विचार केला तर मराठी भारतात क्रमांक 3 वर व जगात क्रमांक 10 वर सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीत 54 बोलीभाषा आहेत. घटनेनुसार 1965 पासून महाराष्ट्र राज्याची देवनागरी लिपीतील मराठी भाषेचा आपण राजभाषा म्हणून स्वीकार केला आहे. आता तिला अभिजात भाषेचाही दर्जा मिळाला आहे.
अभिजात भाषा म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारकडून दिला जाणारा दर्जा, जो कालपर्यंत तामीळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया यांना मिळाला होता. तो आज मराठीसोबत पाली, प्राकृत, बंगाली, असामी याही भाषांना मिळाला. पण मराठीच्या व महाराष्ट्राच्या उगमाचा विचार करता रामायण, महाभारतापासून अनेक संदर्भ सापडतात. रामायणात प्रभू रामचंद्र व सीतामाई नाशिक येथील पंचवटीत राहत होते, तर महाभारतातील भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी कौडिण्यपूर राजाची राजकन्या होती. कौडिण्यपूर आताच्या नागपूरजवळ आहे. पण इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार करता इ.स.पूर्व तिसर्या शतकात गौतम बुद्धांचा शिष्य मोगलीपुत्त दिस्स याने बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी मराठी प्रदेशात शिष्य पाठविल्याचा संदर्भ सापडतो. त्यानंतरच्या काळात हा प्रदेश मौर्य साम्राज्याचा भाग असल्याचा संदर्भ इतिहासात सापडतो. सम्राट अशोकाच्या काळात महाराष्ट्रातील सोपारा आताचे नालासोपारा या बंदरातून पूर्व आफ्रिका, मेसोपोटेमिया, एडन व कोचीन असा व्यापार सुरू असे. इ.स.पूर्व चे 2 रे शतक ते इ.स.चे 2 रे शतक या कालखंडात येथे सातवाहन राजे राज्य करत होते. हा कालखंड म्हणजे समृद्धीचा, विदेशी व्यापाराचा कालखंड. या कालखंडात दोन समृद्ध ग्रंथ लिहिले गेले, ते प्राचीन मराठी प्राकृत भाषेत लिहिले. पहिला ग्रंथ गुनाढ्याचा कथासरित्सागर किंवा बृहत कथासरित्सागर. त्यात वर्णन असलेला मराठी समाज वैभवसंपन्न आहे. दुसरा ग्रंथ सातवाहन राजा हालने रचलेली गाथासप्तशती. या कालखंडात भाषेचे वहन झाले ते शौरसेनी पैशाचीचे पुढे मराठीकडे मार्गक्रमण झाले. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीने इ.स. 78 मध्ये शालिवाहन शक सुरू केले. सातवाहन राजांचे वैशिष्ट्य म्हणजे, ते पराक्रमी व प्रगतिशील होते.
सातवाहनांनंतर महाराष्ट्रात वाकाटकांचे साम्राज्य होते. त्यांची राजधानी विदर्भातील वत्स्यगुल्म म्हणजे आताचे वाशिम. वाकाटक व गुप्तांचा कालखंड एकच इ.स. 4 थे, 5 वे, 6 वे शतक. वाकाटकांनंतर या प्रदेशावर चालुक्यांचे राज्य होते. सातव्या शतकात भारतात आलेल्या चिनी प्रवासी युवानश्वांगने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याची गोदावरीच्या काठी असलेल्या त्याच्या प्रतिष्ठान म्हणजे आताचे पैठण नामक राजधानीत भेट घेतल्याचा संदर्भ त्याच्या प्रवासवर्णनात आहे. त्यात तो मराठी माणसाचे वर्णन करताना सांगतो, मराठी वृत्तीने प्रामाणिक आहेत, मित्रासाठी जीव देणारे आहेत, शत्रुत्व झाले तर जीव घेणारेही आहेत. वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकुट राजांच्या काळात अजिंठा-वेरूळची लेणी तयार झाली. दक्षिणेत रठीक नावाचा जनसमूह होता. या रठीकचे संस्कृतीकरण झाल्यावर राष्ट्रीक असा शब्द तयार झाला. त्यातूनच पुढे महाराष्ट्र हा शब्द तयार झाला, असे मत अनेक इतिहास लेखकांचे आहे.
अशा या महाराष्ट्रातील मराठीची पहिली अद्याक्षरे सापडतात ती कर्नाटकातील म्हैसूरजवळील श्रवणबेळगोळा येथील वर्धमान महावीरांच्या भव्य पुतळ्याखाली.
श्री चामुंडराये करवियले
गंगाजे सुत्ताले करवियले
ही मराठीची अद्याक्षरे मोडी लिपीत असून, त्या पुतळ्याचे नाव भद्रबाहू आहे. या शिलालेखावर इ.स.9 वे शतक असे कोरले आहे. मराठीचा जन्म प्राकृतोद्भव की संस्कृतोद्भव, पण या प्रश्नाचे उत्तर शोधताना बहुसंख्य भाषाशास्त्री मान्य करतात की, मराठी संस्कृतोद्भव आहे. तिच्यावर प्राकृताचेसुद्धा सखोल संस्कार आहेत. शब्द संख्येचा विचार केला तर मराठीत 95 टक्के शब्द संस्कृतपासून आले आहेत. अनेक इतिहास संशोधकांच्या मते मराठी भाषेतील पहिला ग्रंथ विवेकसिंधु असून, तो मुकुंदराज यांनी लिहिला. ते मराठवाड्यातील अंबाजोगाई येथील आहेत. हा ग्रंथ 12 व्या शतकात लिहिला गेला. त्यानंतर सुमारे 75 ते 100 वर्षांनी महानुभाव पंथाच्या चक्रधर स्वामींनी लीळाचरित्र ग्रंथ लिहिला. त्यानंतर मराठी भाषेचा विकास वेगाने झाला. यादव काळात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला. यादवांचे राज्य अनेक अर्थाने शांततेचे, संपन्नतेचे व विकासाचे राज्य होते. या कालखंडात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना केली व त्यातून अवघे विश्वचि माझे घर हे सांगताना आपली जागतिकीकरणाची दृष्टी स्पष्ट केली. शंकराचार्य मूळचे केरळातील पेरिया ऊर्फ पूर्णा नदीकाठावरील केरली गावचे. त्यांनी मांडलेला विचार निवृत्तिनाथांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरांना मिळाला. ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांसाठी भक्तीचा मार्ग सांगितला व वारकरी संप्रदायाची स्थापना केली. पुढे हा विचार ज्ञानेश्वरांचे शिष्य नामदेवांनी उत्तरेत नेला. महाराष्ट्रात संत तुकारामांनी याच विचाराचा विकास केला म्हणूनच म्हणतात,
ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस।
मराठीची गौरव पताका ज्या जोडगोळीमुळे अभिमानाने डोलते ती हीच ज्ञानबातुकोबाची जोडी. इ.स. 1310 पर्यंत महाराष्ट्रात यादवांचे राज्य होते. यादवांनी ठिकठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अशी हेमाडपंती मंदिरे बांधली. याच काळात भास्कराचार्यांनी लीलावती हा गणितावर संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला. 1325 ते 1565 दक्षिण भारतात विजयनगरचे साम्राज्य होते. पण 13 व्या शतकापासून महाराष्ट्रावर इस्लामी आक्रमणे सुरू झाली. अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुघलक, मोगल व सुलतानशाही यांनी 16 व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत महाराष्ट्राच्या बर्याच मोठ्या भागावर राज्य केले. यादवांच्या अस्तानंतर समाज जागृत व एकसंघ ठेवण्याचे काम संतांनी केले. संतांचे कार्य, यादवांचा इतिहास व छत्रपती शिवरायांची प्रेरणा यातून मराठ्यांनी देशभर साम्राज्य उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यनिर्मितीसोबत भाषा शुद्धीकरणाच्या चळवळीचे बहुमोल कार्य केले. त्यांनी राज्यव्यवहार कोश निर्माण केला. स्वराज्याच्या सीमेबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगून ठेवले आहे. सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत म्हणजेच पेशावरपासून तंजावरपर्यंत हिंदवी स्वराज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा. जेव्हा मराठे 1757 ला अटकेपार पोहोचले तेथून रघुनाथरावाने पेशवे नानासाहेबांना पत्राद्वारे कळविले, थोरल्या आबासाहेबांनी (छत्रपती शिवाजी महाराजांनी) दिलेले स्वप्न आपण पूर्ण करीत आणले आहे. पुढे आपण आदेश द्याल तर मराठी जरीपटका काबूल कंदाहारवर फडकवू. पण त्याचवेळी इकडे प्लासीच्या लढाईत इंग्रजांची सरशी झाली होती, तेव्हा तुम्ही परत या, कारण पेशव्यांसहित समस्त मराठ्यांना समजत होते की, इंग्रजांपासून आपल्याला धोका आहे. महाराष्ट्र नेहमी देशासाठी लढला, पानिपतचे युद्ध केवळ मराठे मराठी सत्तेसाठी नाही लढले; दिल्लीची सत्ता पुन्हा परकीयांच्या ताब्यात जात होती, ती वाचवण्यासाठी लढले. सन 1818 ला मराठी सत्तेच्या अस्तानंतरही इंग्रजांना महाराष्ट्रात सुखासुखी राज्य करता आले नाही. शिवरायांचा वारसा पुढे महाराष्ट्राने सुरू ठेवला. कारण आपण पारतंत्र्यात का गेलो हा विचार तेवढ्याच वेगाने सुरू झाला. आत्मगत चिंतन सुरू झाले. शाळा सुरू झाल्या पाहिजेत. इंग्रजी शिक्षण मिळाले पाहिजे. विषमता दूर केली पाहिजे. 1821 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी ’दर्पण’च्या माध्यमातून पहिले वृत्तपत्र सुरू केले. पेशव्यांच्या दरबारी असणारे गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांनी आपल्या दोषांचा अभ्यास करत शतपत्रे लिहिली. येथे स्वतःकडे कठोरपणे पाहण्याची मराठी माणसाची वृत्तीच अधोरेखित होताना दिसते.
सन 1857 च्या उठावात भाग घेणारे मराठी सेनानी राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांचे स्वप्न एकच होते, फिरंग्यांच्या तावडीतून देश मुक्त करू. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंच्या रूपात क्रांतिकारकांचे किंवा भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांच्या रूपात राजकीय सुधारणेचे किंवा फुले-शाहू-आंबेडकरांच्या रूपात समाज व धर्मसुधारणेचेही महाराष्ट्र केंद्रबिंदू ठरले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच वेळी चातुर्वर्ण व्यवस्थेशी लढा दिला. दलितांवर होणार्या अन्यायाविरुद्ध लढले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, संविधान निर्मितीचे अभ्यासपूर्ण कार्य केले. हिंदू राष्ट्रवादाचा विचार मांडणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे या विचारधारेचे एक, तर दुसरे आरएसएसचे प्रणेते डॉ. केशव बळिराम हेडगेेवार मूळचे आंध्रचे असले, तरी विचारांचे मुख्य केंद्र महाराष्ट्रातील नागपूर होते. भारतातील कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य श्रीपाद अमृत डांगे महाराष्ट्रातील. टाटांच्या बरोबरीने लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी महाराष्ट्रात उद्योग सुरू केले. लुनिए ब्रदर्सने पहिला चित्रपट केला तो दादासाहेब फाळकेंनी बघितला. त्यातून त्यांनी पहिला मराठी चित्रपट बनविला. तो पूर्णपणे भारतीय दृष्टिकोनातून व त्या चित्रपटाचे नाव होते, अयोध्येचा राजा. म्हणून त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाते.
शेतीतील सहकार चळवळीचा जन्म महाराष्ट्रातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांंनी प्रवरानगर येथून सहकारातून उद्योग व्यवसाय विकसित केला. पुढे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, रत्नाप्पा कुंभार, तात्यासाहेब कोरे, काकासाहेब वाघ व नंतर देशभर चळवळ विकसित झाली. शेतकरी संघटित करणे हे अशक्य वाटणारे काम शरद जोशींनी करून दाखविले. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळाला पाहिजे हा विषय घेऊन त्यांनी चळवळ उभी केली, त्याचा देशाच्या धोरणावर प्रभाव पडला, कृषी आयोग बनवावा लागला, शरद जोशी त्याचे अध्यक्ष झाले.
स्त्रीमुक्ती चळवळ- महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची सुरुवात केली. आनंदीबाई जोशी, ताराबाई शिंदे यांसारख्या अनेक स्त्रियांनी शिकून महत्त्वपूर्ण योगदान दिले. महाराष्ट्रात साठोत्तरी साहित्यात दलित साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. त्यामध्ये अण्णा भाऊ साठे, दया पवार, बाबूराव बागूल, केशव मेश्राम, माधव कोंडविलकर, नामदेव ढसाळ, शरणकुमार लिंबाळे, यांची नावे घेता येतील. संगीत-हिंदुस्तानी क्लासिकल संगीताचा वैभवशाली कालखंड महाराष्ट्रापासून सुरू होतो. दाक्षिणात्य म्हणजे कर्नाटकी संगीत व हिंदुस्तानी क्लासिकल म्हणजे उत्तर भारतीय संगीत या दोघांचा संयोग महाराष्ट्रात दिसतो म्हणूनच पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज, किशोरी अमोणकर, परविन सुलतान, प्रभाताई अत्रे, कुमार गंधर्व, असा वारसा महाराष्ट्रात निर्माण होण्यास मदत झाली.
जगातील सर्वांत मोठा शास्त्रीय संगीताचा महोत्सव सवाई गंधर्व महोत्सव पुण्यात होतो. आद्य नाटककार विष्णुदास भावे यांचा 1853 साली सांगलीच्या राजवाड्यात सीता स्वयंवर या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग झाला आणि मराठीतील नाट्यपरंपरेचा जन्म झाला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या दोन महाराष्ट्रातील भारतरत्नांनी आपापल्या कार्यक्षेत्रात केलेल्या देदीप्यमान कामगिरीने जग जिंकले. पुण्यातील बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक संघटना बांधायला सुरुवात केली. पुढे 1986 मध्ये पंतप्रधान राजीव गांधींनी लक्ष घातले व ग्राहक संरक्षक कायदा अस्तित्वात आला.
आज मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे, जनभाषा झाली पाहिजे. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा खर्या अर्थाने टिकवायचा असेल, तर माझ्या मते आपण यासंदर्भात मुळावर काम करणे अत्यंत गरजेचे आहे. हे मूळ म्हणजे शालेय स्तरावर मुलांना सर्व विषय मातृभाषेतून म्हणजे मराठीतून शिकवणे, उच्च शिक्षण हेही मराठीतून घेता येईल अशी शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे. तर आणि तरच ती पाझरत जाऊन भविष्यात खर्या अर्थाने अभिजातता प्राप्त करेल. आजच्यासारखी तिच्या भविष्याबद्दल आणि भवितव्याबद्दल शंका कोणी घेणार नाही. अर्थात, त्यासाठी साने गुरुजींना अभिप्रेत असलेल्या आंतरभारतीचा स्वीकार करणे अपेक्षित आहे. अमराठी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करणे हे अनिवार्यच आहे. 2020 मध्ये प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून मोफत व सक्तीचे दिले गेले पाहिजे, असे म्हटले आहे. याआधीच्याही प्रत्येक शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून आणि सर्वांना मोफत सक्तीचे देणे बंधनकारक होते. पण प्रत्यक्षात तसे घडलेले दिसत नाही. आजही देशात अनेक मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. याची जबाबदारी घेणारी व्यवस्था किंवा यंत्रणा नाही. हा कदाचित यातील दोष असू शकतो. सध्या मराठी शाळांची अवस्था फारच दयनीय आहे. त्याला आपण सर्वच मराठी भाषिक जबाबदार आहोत. शालेय स्तरावर सर्वज्ञान आपण मातृभाषेतून देण्यास यशस्वी झालो तर मराठी भाषा खर्या अर्थाने अभिजात ज्ञानभाषा व जनभाषा झाल्याशिवाय राहणार नाही. या राष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्य उभे केले. आपण हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवत आजच्या प्रतिकूल परिस्थितीत मराठी शाळांचा उत्तम रीतीने दर्जा वाढवला तर अभिजात मराठी ज्ञानभाषा व जनभाषा झाल्याशिवाय राहणार नाही.