पिंपळगाव बसवंत : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील नामवंत कवी संदीप जगताप व शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कवितासंग्रहासाठीचा लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार यावर्षी चांदवड येथील कवी सागर जाधव यांच्या ‘माती मागते पेनकिलर’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. कवी लक्ष्मण महाडिक यांच्या निवड समितीने यावर्षी या पुरस्काराची निवड केली. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अंतिम फेरीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. परंतु, नव्या काळाचे खेड्यातील प्रश्न घेऊन, नव्या प्रतिमा असलेली कविता माती मागते पेनकिलर या कवितासंग्रहात बघायला मिळते. तंत्रयंत्रकाळातील कविता या संग्रहात आली आहे. शेतकर्यांपुढे उभे राहिले नवे प्रश्न या कवितेने सशक्तपणे मांडले आहे. म्हणून हा कवितासंग्रह या पुरस्कारासाठी पात्र ठरला, असे निवड समितीने सांगितले. मान्यवरांच्या हस्ते लवकरच या पुरस्काराचे वितरण मॅग्नस फार्म येथे होणार आहे. सागर जाधव यांना महाराष्ट्रातील अतिशय सन्मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातले अनेक मान्यवर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.