मोबाईलवर स्टेटस ठेवत होमगार्डने केले असे काही… संपूर्ण गावच हादरले…. नेमके घडले तरी काय

 

मोबाईलवर स्टेटस ठेवत होमगार्डने केले असे काही…

संपूर्ण गावच हादरले…. नेमके घडले तरी काय

 

देवळा :  प्रतिनिधी

मोबाईलवर श्रद्धांजली चे स्टेटस ठेवत होमगार्ड असलेल्या व्यक्तीने अतिशय टोकाचे पाऊल उचलले. त्याच्या या कृतीमुळे संपूर्ण गाव सुन्न होऊन गेले. देवळा तालुक्यातील माळवाडी येथील घटनेने संपूर्ण देवळा तालुका हादरला आहे

देवळा तालुक्यातील फुले माळवाडी येथे रविवारी दि.३० रोजी सकाळी एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील चारही जीवांचा एकत्र झालेला अंत पाहून गाव थरारून गेले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद बाळू शेवाळे (४०) हे होमगार्ड असून, घरची थोडीशी शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. रविवारी पहाटे त्यांनी पत्नी कोमल (३५), इयत्ता तिसरीत शिकणारी ९ वर्षांची मुलगी हर्षाली आणि दोन वर्षांचा मुलगा शिवम यांची हत्या केली. तिघेही झोपेत असताना ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या हृदयद्रावक कृत्यानंतर गोविंद यांनी रविवार दि. ३० रोजी सकाळी ६.५१ वाजता व्हॉट्सअॅपवर भावपूर्ण श्रद्धांजलीचा स्टेटस टाकला. धक्कादायक बाब म्हणजे, या स्टेटसमध्ये त्यांनी स्वतःचे, पत्नीचे आणि मुलांचे फोटो पोस्ट केले होते. काही मिनिटांतच त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

नातेवाईकांनी आणि इतरांनी स्टेट्स पाहिल्याने तात्काळ घराकडे धाव घेतली असता चारही जण मृतावस्थेत आढळले. क्षणात संपूर्ण गावात दु:खाचे सावट पसरले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, पोलीस उपनिरीक्षक राऊत, विनय देवरे, तसेच प्रकाश शिंदे, राहुल शिरसाठ, नितीन बारहाते, दिलीप सोनवणे, सुनील पवार, सुरेश कोरडे, देवराम खांडवे, श्रावण शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून नाशिक येथील फॉरेन्सिक पथकाने सगळ्या तांत्रिक बाबी तपासल्या आणि मृतदेह देवळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत,
या कुटुंबाचा असा अचानक आणि भीषण अंत का झाला? आर्थिक ताण, कौटुंबिक वाद किंवा मानसिक तणाव यापैकी कोणते कारण यामागे दडले आहे, याचा तपास देवळा पोलिसांकडून सुरू आहे असून यासंदर्भात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुले माळवाडी गावाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एका होमगार्डच्या घरातील चार दिवे एकाच क्षणात विझल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *