मासिक पाळी तपासण्यासाठी
विद्यार्थिनींसोबत केले असे काही…
कुठे घडला नेमका हा प्रकार?
शहापूर : प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील नामांकित आर. एस. दमानिया इंग्लिश स्कूलमध्ये 14 ते 15 वयोगटातील सुमारे 12 विद्यार्थिनींवर अमानवी व लज्जास्पद प्रकार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
शाळेच्या स्वच्छतातगृहात रक्ताचे डाग आढळल्याने शाळा प्रशासनाने मासिक पाळीच्या संशयावरून मुलींना कपडे उतरवून तपासणीस भाग पाडल्याचा आरोप पालकांनी केला आहे. 12 विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या संशयावरून कपडे उतरवायला लावल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे.
शाळेच्या नावाखाली हा नक्की प्रकार काय? शिक्षणाऐवजी अमानवता शिकवली जात आहे का? या घटनेमुळे विद्यार्थिनींच्या मनावर खोल परिणाम झाला आहे. त्यामुळे पालकांनी तीव्र निदर्शने करत मुख्याध्यापिकेच्या अटकेची मागणी केली आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली असली, तरी शाळा प्रशासनाकडून अजूनही कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण नाही. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही इथंच ठाण मांडून बसणार, असा स्पष्ट इशारा पालकांनी दिला. अखेर शाळेच्या मुख्याध्यापिकेवर पोस्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
शाळेच्या मुख्याध्यापिकेने इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक दबाव टाकत पाचवी ते दहावी इयत्तेतील सर्व विद्यार्थिनींसोबत अत्यंत खालचा पातळीचा लजास्पद प्रकार केला.
हा प्रकार समजताच संतप्त पालकांनी शाळेसमोर निदर्शने केली. विद्यार्थिनींच्या मनावर खोल आघात करणार्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची जोरदार मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी या मुख्याध्यापिकेवर पोस्को दाखल केला आहे.