चांदीच्या दागिन्यांची खरेदी, श्रद्धा आणि गुंतवणुकीचा मिलाफ
नाशिक ः प्रतिनिधी
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली असून, सजावटीबरोबर लाडक्या बाप्पासाठी
दागिन्यांची खरेदी करण्याकडे कल वाढल्याचे चित्र आहे. चांदीच्या मूर्तीसह विविध अलंकार, पूजासाहित्य सोने-चांदी, तसेच फॉर्मिंग, गोल्ड, सिल्व्हर प्लेटेड, मोत्यांचे आदी बजेटनुसार दागिने खरेदी केले जात आहेत.
चांदीचा भाव लाखापार गेला असून, चांदीचा दर प्रति दहा ग्रॅम एक हजार 160 रुपये आहे. एक ग्रॅमपासून ते 100 ग्रॅमपर्यंतच्या मोदक, दूर्वा आवड व बजेटनुसार उपलब्ध आहेत.
बाप्पापाठोपाठ ज्येष्ठा गौरींचेही आगमन होत असल्याने गौराईंसाठी दागिने खरेदी केली जात आहेत. लाडक्या बाप्पासाठी सराफ बाजारात विविध दागिन्यांसह पूजेचे साहित्य उपलब्ध झाले आहे. चांदीच्या बाप्पांनाही विशेष पसंती मिळत आहे.
देवासाठी चांदीचा खास साज घेत बाप्पाप्रति श्रद्धा व गुुंतवणुकीचा मिलाफ साधला जात आहे. चांदीचे मोदक, बाप्पाला आवडणार्या जास्वंदीचे फूल, दूर्वा, हार, हातातील कडे, उंदीर, सोंड, मुकुट, जास्वंद हार, बाळी, टिकली, पानसुपारी, तर ज्येष्ठा गौरींसाठी दागिने, कमरपट्टा, मुकुट, नथ, मोत्याचे दागिने, सोने-चांदी, फॉॅर्मिंग व आर्ट ज्वेलरी या नव्या पर्यायांनी बाजारपेठ सजली आहे. महिलांची आवड व बजेटनुसार अनुरूप हलक्या वजनातील आकर्षक दागिन्यांना मोठी मागणी असल्याचे चित्र आहे. चांदीच्या मूर्तीत भर टाकून दरवर्षी किंवा तीन, पाच वर्षांनी भर टाकून नवीन मूर्ती घेण्याचा ट्रेंड पाहावयास मिळतो. बजेटनुसार लहान-मोठ्या मूर्ती खरेदी केल्या जात आहेत. चांदीचे पूजेचे ताट, तांब्या, केळीच्या पानाच्या आकाराच्या नैवेद्याच्या ताटांना पसंती मिळत आहे. कमी वजनापासून उपलब्ध असल्याने बजेटनुसार ग्राहक चांदीच्या पूजा सहित्याची खरेदी करत आहेत.
यंदाचे खास आकर्षण म्हणजे, चांदीच्या गणपती मूर्ती 11 ग्रॅमपासून ते 500 ग्रॅमपयर्र्ंत उपलब्ध आहेत. गुंतवणूक, पर्यावरणपूरक व श्रद्धा यांचा संगम म्हणून खरेदी करण्याकडे कल वाढल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
दूर्वा, मोदक ः 300 ते 15 हजार रुपये
जास्वंद फूल ः 300 ते 5 हजार रुपये
मुकुट 2500 रुपयांपासून पुढे
गेल्या काही वर्षांंत नवीन परंपरा सुरू झाल्याचे चित्र आहे. दरवर्षी बाप्पाच्या नावाने चांदी घेऊन प्रत्येक वर्षी किंवा तीन वर्षांनी जुन्या मूर्तीत भर टाकून नवी मूर्ती बनवली जाते. गणपती बाप्पा आणि ज्येष्ठा गौरींसाठी चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढते आहे.
– चेतन राजापूरकर, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र बोर्ड आयबीजेए