अक्षरबाग बालसाहित्य मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

सांस्कृतिक कार्यक्रमांसह नाट्य छटा आणि ‘अद्भूत बाग’ बालनाट्याला दाद

नाशिक : प्रतिनिधी

ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काल दि. 27 फेब्रुवारी रोजी मु. शं. औरंगाबादकर सभागृहात अक्षरबाग बालसाहित्य मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, सार्वजनिक वाचनालय आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत बालसाहित्य मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी ‘सावाना’चे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष डॉ. विक्रांत जाधव, प्रमुख सचिव धर्माजी खोडके, बालभवन प्रमुख प्रा. सोमनाथ मुठाळ, सांस्कृतिक सचिव संजय करंजकर, मनपा अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी उपस्थित होते. मेळाव्याच्या सुरुवातीला तुळजा देसले या चिमुरडीने गणेश वंदना आणि शिवतांडव स्त्रोत्र म्हणून उपस्थितांची दाद मिळवली. आयुक्तांनी आपल्या भाषणात मातृभाषेचे महत्व अधोरेखीत केले. प्रगती होण्यात भाषेचा अडसर ठरत नाही. मात्र मातृभाषेत जास्त चांगले आकलन होते. मातृभाषा त्याबरोबर देशाला जोडणारी राष्ट्रभाषा हिंदी आणि विश्वभाषा इंग्रजी अशा एकूण तीन भाषांमध्ये प्राविण्य मिळविले पाहिजे. मग तुम्ही कुठलेही क्षेत्र पादाक्रांत करु शकता, असे मार्गदर्शन केले. मेळाव्याला मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची जास्त संख्या पाहून आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालय विविध उपक्रम राबवून मराठीला पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे सांगून संस्थेच्या पदाधिका-यांचे कौतुक केले. मेळाव्यात नाट्यछटा स्पर्धेत 22 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सादरीकरणाचा 3 मिनीटांचा कालावधी होता. डॉ. सोनाली कुलकर्णी, ईश्वर जगताप, सतीश वाणी परीक्षक होते. प. सा. नाट्यगृहात लेखक-दिग्दर्शक सुजीत जोशी यांच्या ‘अद्भूत बाग’ या 40 मिनीटांच्या बालनाट्याला दाद मिळाली. एक्सपेरिमेंटल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘मोबाईलचे दुष्परीणाम’ या विषयावर सादर केलेले हे बालनाट्य ‘सावाना’ स्पर्धेत प्रथम आले आहे. दुपारच्या सत्रात ‘साहित्यिकांच्या गप्पा’मध्ये आबा महाजन, राज शेळके, चिदानंद फाळके, चैत्रा हुदलीकर, तृप्ती तिजारे-चावरे यांनी सहभाग घेतला होता. मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात गोदावरी गीत, आणि मराठीची महती सांगणारी गाणी सादर केली. 15 शाळांचा सहभाग होता. मेळाव्याच्या शेवटी पोवाडा स्पर्धेसह इतर स्पर्धेतील विजेत्यांना ज्येष्ठ साहित्यिक तथा 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, शाहीर स्वप्नील डुंबरे, अभिनेते धनंजय वाबळे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. स्वागत आणि प्रास्ताविक प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी केले. गीता बागूल यांनी सुत्रसंचालन केले. गितांजली नाईक यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *