नाशिक जिल्ह्यात एनसीएमसी कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

वीस दिवसांत 8 हजारांहून अधिक नोंदणी

नाशिक ः प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना भाडे सवलत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, 16 फेब्रुवारीपासून आतापर्यंत 8 हजार 269 जणांनी कार्ड नोंदणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी)सवलतधारक प्रवाशांसाठी सुरू केलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड उपक्रमाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. परिवहन मंत्री, एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या माहितीप्रमाणे आठवड्याभरात या उपक्रमांतर्गत एक लाखाहून अधिक प्रवाशांनी कार्डसाठी नोंदणी केली आहे.
नोंदणीत महिला सन्मान योजना लाभार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग नोंदला गेला असून, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवासी यांनीही उपक्रमात सहभाग
घेतला आहे.
नोंदणी केंद्रांवर बाहेरील व हद्दीतील सुरुवात करणार्‍या केंद्रांची संख्या अनुक्रमे 4 आणि 13 असून, जिल्ह्यातील नागरिकांना सुविधेसाठी हा उपक्रम चालू आहे. परिवहन विभागाने प्रवाशांना सांगितले आहे की, महिलांना 50 टक्के व ज्येष्ठांना 50 टक्के व काही प्रकरणांमध्ये 100 टक्के भाडे सवलत घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य आहे.
एसटी महामंडळाचा हा उपक्रम केवळ तांत्रिक बदल नाही तर प्रवासाला सूलभ, सुरक्षित आणि पारदर्शक डिजिटल स्वरूप स्वागतार्ह असल्याचे प्रवाशांनी सांगितले. समाजमाध्यमांवर एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी कोणतीही मुदत नसून, सवलतधारक प्रवाशांची नोंदणी पूर्ण होईपर्यत स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नसल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांना त्यांच्या जवळच्या बसस्थानक, आगार किंवा अधिकृत एजंटकडे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवाशांना त्यांच्या जवळच्या बसस्थानक, आगार किंवा अधिकृत एजंटकडे नोंदणी करता येणार आहे. टप्प्याटप्प्याने अधिकृत एजंटची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी करू नये. एजंट वाढल्याने कार्डाची नोंदणी करणे सोपे होणार आहे. शेवटची मुदत कोणतीही घोषित केलेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नये. एकाचवेळी गर्दी करू नये. प्रवाशांनी सहकार्य करावे.
– किरण भोसले, विभागीय वाहतूक अधिकारी

राज्य परिवहन मंडळाच्या 13 आगारांतील कार्ड नोंदणी संख्या

नाशिक-1 : 1,876 कार्ड, नाशिक-2 ः 787, मालेगाव : 0, मनमाड 467, सटाणा 1,036, सिन्नर 484, निफाड 458, इगतपुरी 1,243, लासलगाव 245, कळवण 235, पेठ 1,242, येवला 0, पिंपळगाव 196 कार्ड अशी असून, येवला, मालेगाव येथेही कार्ड नोंदणी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी सांगितले. यामध्ये महिला सन्मान योजना कार्डसाठी 3,441, अमृत ज्येष्ठ नागरिक कार्डसाठी 2,419, तर इतर कार्डसाठी 189 नोंदणी झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *