नवचेतना अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यातील पहिला एकल महिला पुनर्विवाह मेळावा

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने राज्यातील पहिल्यांदाच एकल महिलांच्या पुनर्विवाहासाठी सर्व जातीय मोफत वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या नवचेतना अभियानाच्या माध्यमातून एकल महिलांच्या सामाजिक, मानसिक व आर्थिक पुनर्वसनाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. रविवारी (दि. 14) दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत जिल्हा परिषद बहुद्देशीय सभागृहात हा मेळावा होणार आहे.
पुनर्विवाहासाठी इच्छुक असलेल्या एकल महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी पवार यांनी केले. या उपक्रमासाठी नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत.
नावनोंदणीसाठी 8453902222, 7447785910 या क्रमांकावर संपर्क करावा. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून इच्छुक वधू-वर सहभागी होणार असून, जे युवक विधवा किंवा घटस्फोटित महिलेसोबत विवाहासाठी तयार असतील, त्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन आज नाशिक जिल्हा परिषद नवचेतना अभियान राबवत आहे. ज्या मातीवर महात्मा फुले आणि महर्षी कर्वेंचे संस्कार आहेत, तिथे एकाही भगिनीला एकाकी आयुष्य जगण्याची वेळ येऊ नये. हा लढा जुनाच आहे, फक्त माध्यम नवीन आहे. हा केवळ एक मेळावा नाही, तर ही एक सामाजिक चळवळ आहे. या चळवळीत आपणही सहभागी व्हा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले.

उच्चशिक्षित नोकरदार उमेदवारांना प्राधान्य

या मेळाव्यात सहभाग घेण्यासाठी पुरुष उपवरांनी, इच्छुकांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी पुरुष उपवर हा पदवीधर व उच्चशिक्षित असल्यास प्राधान्य तसेच त्यांनी त्यांची कार्यक्रमापूर्वी नावनोंदणी करणे बंधनकारक असेल. नावनोंदणी केलेल्या पुरुषांना पास दिला जाणार असून, पासशिवाय पुरुषांना प्रवेश मिळणार नाही. त्याचसोबत ओळखीचा व नाव नोंदणीचा पुरावा (पास) सोबत आणणे आवश्यक असेल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *