एसटी चालक-वाहकांनी घडविले माणुसकीचे दर्शन

मनमाडला महिलेने दिला बसमध्येच गोंडस बाळाला जन्म

मनमाड : प्रतिनिधी
मनमाड बस आगाराचे चालक-वाहक राजापूर मुक्कामी बस भालूरमार्गे मनमाडला येत असताना, भालूर येथील ज्येष्ठ महिला गर्भवती सुनेला घेऊन बसमध्ये बसली. मात्र, मनमाडजवळ आल्यानंतर सुनेला त्रास होतोय, आम्हाला उतरून द्या, रिक्षात जातो, असे महिलेने सांगितले. मात्र, प्रसंगावधान राखून चालक व वाहकाने बस थेट उपजिल्हा रुग्णालयात नेली. मात्र, तोपर्यंत महिलेने एक गोंडस बाळाला एसटी बसमध्येच जन्म दिला होता. मात्र, वेळ झाला असता तर अघटित घडले असते. बाळ व माता सुखरूप असून, चालक व वाहकाने माणुसकीचे दर्शन घडविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, मनमाड आगाराच्या राजापूर मुक्कामावरून येणार्‍या बसमध्ये कर्तव्याबरोबरच माणुसकी जपणार्‍या लालपरीच्या सेवकांची कार्यतत्परता प्रवाशांनी अनुभवली. सकाळी राजापूर-मनमाड मार्गावर भालूर येथील रहिवासी सुनीता किशोर ढगे एसटी बसमध्ये(एमएच 14 बीटी 4495) रुग्णालयात जाण्यासाठी बसल्या. मनमाड रेल्वे ब्रीजवर सकाळी 6.45 वाजता बस आल्यानंतर सुनीताताईंना प्रसूती वेदना जाणवायला लागल्या. त्यांच्यासोबत असलेल्या आजीबाईंनी लागलीच चालक राहुल गंगाधर पवार व वाहक संजय शांताराम पवार यांना बस थांबवण्याची विनंती केली. मला माझ्या सुनेला रिक्षामध्ये बसवून दवाखान्यात न्यावे लागणार आहे. तिची प्रसूती कधीही होऊ शकते, असे सांगितले. एसटी बसचे चालक-वाहकांनी प्रसंगावधान राखून वेळेचा अपव्यय न करता तडक बस उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाकडे वळवली. बस उपजिल्हा रुग्णालयात पोहोचल्यानंतर आरोग्यसेविकांनी तपासणी केली असता, सुनीतातार्ईंची प्रसूती बसमध्ये झाल्याचे त्यांना दिसले. तद्नंतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून बाळाला व आईला सुखरूप बसमधून उतरवले. जर चालक-वाहकांनी रिक्षाची वाट बघितली असती किंवा वेळीच प्रसंगावधान राखून बस उपजिल्हा रुग्णालयात नेली नसती तर काहीही अनर्थ होऊ शकला असता, असे आरोग्यसेविकांनी सांगितले. सर्व प्रवाशांनी, नागरिकांनी बस चालक-वाहकांचे कौतुक केले. जनमानसामध्ये लालपरीची विश्वासार्हता द्विगुणित करण्याच्या या कार्यासाठी आगार व्यवस्थापक विक्रम नागरे यांनी चालक राहुल पवार व वाहक संजय पवार यांचा सत्कार केला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *