31 प्रभागांतून 122 नगरसेवक निवडले जाणार
भाजपकडे ओघ, शिंदेसेनेलाही प्रतिसाद
शिवसेना ठाकरे गटाची अस्तित्वाची लढाई
नाशिक : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.15) नाशिकसह 29 महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार नाशिक महापालिकेसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होऊन दुसर्याच दिवशी 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. 31 प्रभागांतील 122 जागांसाठी 13 लाख 60 हजार 722 मतदार नवे कारभारी महापालिकेत पाठवणार आहेत. नाशिक महापालिकेत गेल्या साडेतीन वषार्ंपासून असलेली प्रशासक राजवट महिनाभरानंतर संपुष्टात येणार आहे.
नाशिक महापालिकेत 13 मार्च 2022 रोजी प्रशासकीय राजवटीला सुरुवात झाली. भाजपचे माजी महापौर सतीश कुलकर्णी प्रशासकीय राजवट लागण्यापूर्वी अखेरचे महापौर ठरले. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासकीय राजवट लागली होती. पुन्हा एकदा महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.
कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्यावर भाजपने धुरा सोपवली आहे. दरम्यान, महायुतीमधील पक्ष व महाविकास आघाडी स्वबळावर लढणार की एकत्र लढणार, याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी होऊ घातलेली महापालिकेची निवडणूक अस्तित्वाची असणार आहे. शिवसेना फुटल्यानंतर अवघे चार-पाच माजी नगरसेवक पक्षात राहिले आहेत. उर्वरित माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकार्यांनी भाजप व शिंदेसेनेची वाट धरली.
सध्याच्या परिस्थितीत भाजपकडून उमेदवारी मिळावी याकरिता ओघ दिसतो आहे. त्याखालोखाल शिंदेसेनेकडे उमेदवारीसाठी इच्छुकांचा प्रतिसाद दिसतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 च्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकारने त्याद़ृष्टीने पावले टाकली होती.नाशिक महापालिकेसाठी 11 जूनपासून निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरवात झाली होती. 22 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय जाहीर होऊन कार्यक्रम प्रक्रिया
पूर्ण होणार आहे.
निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण
नाशिक महापालिकेसाठी प्रभागरचना आधीच जाहीर झाली आहे. सन 2017 प्रमाणेच चार सदस्यांचा प्रभाग असणार आहे. यात 29 प्रभाग चार, तर दोन प्रभागांत तीन नगरसेवक निवडून दिले जातील. महापालिकेची अंतिम प्रभागरचना ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रभाग आरक्षणाची सोडत 11 नोव्हेंबर रोजी काढण्यात आली. यानंतर 3 डिसेंबरला प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या. 10 डिसेंबरला प्रारूप मतदार यादीवरील दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या गेल्या. मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी सोमवारी (दि.15) प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर 22 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल.
सिंहस्थामुळे महत्त्व
बरोबर एक महिन्यानंतर महापालिकेतील सत्तेची सूत्रे राजकीय पक्षांच्या हाती जातील. मात्र, तत्पूर्वी नाशिक महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी मोठा रणसंग्राम पाहायला मिळ्णार आहे. दीड वर्षाने सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने त्यानिमित्ताने हजारो कोटींची कामे मार्गी लावली जाणार आहेत.
शिंदेसेना-अजित पवार गट एकत्र लढणार?
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी भाजपने सन्मानजनक जागा दिल्या नाही, तर शिंदेसेना व अजित पवार गट एकत्र येऊन निवडणूक लढण्याची शक्यता आहे. शिंदेसेनेसोबत रिपब्लिकन सेनेची आधीच युती झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत विरोधी पक्षांबरोबच मित्र पक्षांतच काट्याच्या लढती पाहावयास मिळण्याची शक्यता आहे.
प्रभाग 30 मध्ये सर्वाधिक, तर 22 मध्ये कमी मतदार
मनपाने सोमवारी नऊ हजार हरकतींचा निपटारा करत अंतिम प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध केली. यात सात लाख 3 हजार 968 पुरुष, तर सहा लाख 56 हजार 667 महिला व इतर 79 असे एकूण तेरा लाख 60 हजार 722 मतदार निश्चित केले. 31 प्रभागांपैकी प्रभाग 30 मध्ये सर्वाधिक 53 हजार 247 मतदारांची नोंदणी आहे. त्याखालोखाल 31 मध्ये 51 हजार 403 मतदार असून, सर्वांत कमी मतदारांचा प्रभाग 22 मध्ये 33 हजार 798 मतदार आहेत.
nashik
22 corporators will be elected from 31 wards.
Municipal Corporation